

पणजी : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यात गेलेले तीन हत्ती शनिवारी पुन्हा तिळारी खोऱ्यात दाखल झाले. त्यामुळे गोवा सीमेवरील भागात आता हत्तींची संख्या सहावर पोहोचली आहे. या तीन हत्तींमध्ये असलेली मोठी मादी ओंकारची आई आहे. सध्या तिच्यासह पाच हत्तींचा कळप घाटीवडे येथील मंगळ मोडी या जंगलात असून नेहमीप्रमाणे रात्री ते शेती बागायतीत उतरणार आहेत.
दुसरीकडे गोव्यातून दोडामार्ग तालुक्यात गेलेला ओंकार संध्याकाळी केर निडलवाडी येथील प्राथमिक शाळेजवळ होता. तो घोटगेवाडीतून पुन्हा मागे आला आहे. कोल्हापूरमधून गणेश हत्ती आणि छोटी मादी तिळारी खोऱ्यातील घाटीवडेत आली होती. त्यानंतर मोठी मादी (ओंकारची आई) आणि दोन पिल्ले रात्री हेवाळेमध्ये आली.
नंतर पाचही जणांचा कळप घाटीवडेत एकत्र आला. आता तो कळप बांबर्डेच्या दिशेने गेला आहे. हा सगळा भाग पणजी-दोडामार्ग-कोल्हापूर, बेळगाव या राज्यमार्गा शेजारील आहे. दरम्यान, बाहुबली (ऑकारचा पिता) कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात मोटणवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. दोन दिवसांपूर्वी तो कानूर परिसरात होता. तोही खाली उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आई-मुलाच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष
ओंकार आता गोव्यातून केरमध्ये परतला आहे, तर त्याची आई (मोठी मादी) सुद्धा कोल्हापुरातून घाटीवडेमध्ये परतली आहे. या दोघांची भेट व्हावी, यासाठी उपोषण, मुंडण आंदोलन झाले होते. समाज माध्यमांवर अनेकांनी रील्स, पोस्ट, कॉमेंट्सच्या माध्यमातून कळपापासून ताटातूट झालेल्या ओंकारची आणि त्याच्या आईची भेट व्हावी अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी ओंकारला गोव्यातून शिरवलपर्यंत सोबत करत त्याच्या अधिवासात नेले. आता दोघेही एकाच अधिवासात पोहोचल्याने आई व ओंकार एकत्र कधी येतात याकडे ओंकारप्रेमींचे लक्ष आहे.