पणजी : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) घरगुती सामाजिक आरोग्य या अहवालाच्या ८० व्या फेरीतील निष्कर्षांनुसार, गोव्यामध्ये आजारपणाचा दर १८.७ टक्के असून तो देशात चौथ्या क्रमांकावर आहे. जो राष्ट्रीय सरासरी १३१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अहवालानुसार, गेल्या १५ दिवसांच्या कालावधीत १८.७ टक्के व्यक्ती आजारी असल्याचे आढळले. शहरी भागातील १५.५ टक्क्यांच्या तुलनेत ग्रामीण भागात हा दर अधिक होता.
ग्रामीण भागात २३.१ टक्के लोकांनी आजारपणाची नोंद केली. या सर्वेक्षणांतर्गत राज्यातील १६ गावे आणि १६ शहरी तालुक्यांमधील २५६ कुटुंबे आणि १०४० व्यक्तींचा समावेश करण्यात आला. राज्यात वर्षाला दर १००० व्यक्तींमागे ३१ रुग्ण (प्रसूती वगळून) रुग्णालयात दाखल झाल्याची नोंद झाली.
हा दर पुरुषांमध्ये दर १००० व्यक्तींमागे ३५ रुग्ण इतका होता, तर महिलांमध्ये तो दर १००० व्यक्तींमागे २८ रुग्ण इतका होता. अहवालात म्हटले आहे की, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी ६४.७ टक्के रुग्णांवर सरकारी किंवा सार्वजनिक रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. सरकारी किंवा सार्वजनिक रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्यांची संख्या अखिल भारतीय सरासरी ३६.७ टक्क्यांपेक्षा जास्त होती.
३५.४ रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले, शहरी भागांमध्ये ६८. ३ टक्के रुग्णांवर सरकारी किंवा सार्वजनिक रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. प्रत्येक रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रकरणामागे (प्रसूती वगळून) सरासरी वैद्यकीय आणि गैर-वैद्यकीय खर्च २८ हजार ६६९ रुपये होता. अहवालात असे नमूद केले आहे की, एकदा रुग्णालयात दाखल होण्यासाठी स्वतःच्या खिशातून केलेला सरासरी वैद्यकीय खर्च २३ हजार ६६६ रुपये होता. काही संस्थांमधील खर्चात फरक दिसून आला, सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सरासरी (स्वतःहून खर्च) १,६३७ रुपये होता, तर खासगी रुग्णालयांमध्ये ही रक्कम ६३ हजार २५५ रुपये होती
गर्भवतींना प्रसूतीपूर्व सेवा १०० टक्के
गोव्यातील प्रसूती सेवा निर्देशकांनी उच्च व्याप्ती दर्शविली, ज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांतील १०० टक्के गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्व सेवा मिळाली. प्रसूतीपश्चात सेवा शहरी भागात १०० टक्के आणि ग्रामीण भागात २५ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.