

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सांताक्रूझ येथील बोंडवेल तलावाच्या संरक्षण व संवर्धनासाठी तातडीने कठोर उपाययोजना राबवाव्यात तसेच या तलावाच्या सभोवती क्षेत्रात देण्यात आलेले बांधकाम परवाने रद्द करावेत, अशी ठाम मागणी निवेदन देऊन स्थानिक नागरिकांनी स्थानिक आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्यासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन केली. सांताक्रुझ नागरिकांनी स्थानिक आमदार रुडॉल्फ फर्नाडिस यांच्याबरोबर बैठक घेऊन तीन ठराव मंजूर केले होते. या ठरावानुसार, संपूर्ण बोंडवेल पाणलोट क्षेत्राला सरकारने झोन ऑफ इन्फ्लुएन्स म्हणून तत्काळ अधिसूचित करावे. यासंदर्भात आर्थर डिसोझा यांनी सादर केलेला प्रस्ताव सध्या गोवा पाणतळ प्राधिकरणाकडे प्रलंबित असून तो लवकरात लवकर मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ऑगस्ट २०२५ पासून आतापर्यंत बॉडवेल तलावाच्या प्रभाव क्षेत्रात देण्यात आलेल्या सर्व तांत्रिक मंजुरी तत्काळ स्थगित किंवा रद्द कराव्यात. नगर व शहर नियोजन (टीसीपी) विभागाने मंजूर केलेली अतिरिक्त एफएआर देखील निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा
या सर्व मागण्या सरकारपर्यंत निवेदनाद्वारे मंगळवारी मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्या. ठोस व प्रत्यक्ष कृतीसाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आली आहे. बोंडबोल तलावाच्या रक्षणासाठी निर्णायक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करत नागरिकांनी प्रशासनाकडून त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली आहे. सर्व परवाने तत्काळ स्थगित करावेत, अशीही मागणी नमूद केली आहे.
उपोषणाचा इशारा
ग्रामस्थांनी बोंडवेल पाणतळ (वेटलैंड) संरक्षणाबाबत गंभीर चिंता व्यक्त करत बैठक घेतली. पर्यावरण, स्थानिक परिसंस्था तसेच रहिवाशांचे हित जपण्यासाठी 'झोन ऑफ इन्फ्लुएन्स'सह अनिवार्य २०० मीटर बफर झोनचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
१५० मीटर परिसरात कोणताही विकास नाही
डिजिटल गोवा, २६ जानेवारी सांतक्रुझ येथील बोंडवेल तलावाच्या १५० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारच्या विकासाला परवानगी दिली जाणार नाही, जरी त्या भागात आधीच वसाहतीची परवानगी असली तरीही ती रद्द केली जाईल, अशी माहिती नगरनियोजन (टीसीपी) मंत्री विष्वजित राणे यांनी दिली. या संदर्भात सांतक्रूझचे परिश प्रिस्ट फा. रिचर्ड पिन्हेरो यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले. तलावाभोवतालच्या परिसरातील विकासासंदर्भातील मुद्द्यांचा आढावा घेऊन, स्थानिक रहिवाशांच्या भावना आणि व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्र्यांनी स्पष्ट केले की, बोंडवेल तलावाच्या आसपास परवानगी असली तरी ८० एफएसआयच्या मयदिपेक्षा अधिक किंवा अतिरिक्त एफएसआय देण्यात येणार नाही. जर कोणालाही जास्त एफएसआय देण्यात आला असेल, तर तो मंडळाकडून रद्द करण्यात येईल, असे राणे म्हणाले.