

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाफेडला कांदा देऊनही पाच महिन्यांपासून पैसे मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.५) शहरातील द्वारका परिसरातील नाफेड कार्यालयावर मोर्चा काढत तब्बल १० तास ठिय्या आंदोलन केले. आक्रमक शेतकऱ्यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना बाहेर काढत कार्यालयास टाळे ठोकले.
शेतकऱ्यांनी याप्रसंगी नाफेडविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, अडीच हजार शेतकऱ्यांचे तब्बल सव्वाशे कोटी रुपये थकलेले आहे. नाफेड संस्थेने पाच महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, कळवण, सटाणा, देवळा, चांदवड, मालेगाव आदी तालुक्यांमधील शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला.
चांगल्या दर्जाचा कांदा दिल्यानंतर, तेव्हा डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) प्रणालीद्वारे नाफेडकडून ७२ तासांत शेतकऱ्यांच्या खात्यावर बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन नाफेडच्या दिल्लीतील तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले होते. परंतु, आता पाच महिन्यांहून अधिक काळ लोटला. परंतु, नाफेडकडून पेमेंट झाले नाही.
वारंवार मागणी करूनही पेमेंट मिळत नसल्याने सोमवारी पेमेंट थकलेल्या शेतकऱ्यांनी नाफेड कार्यालयावर मोर्चा आणत, शाखा व्यवस्थापक पटनायक यांना विचारणा केली. अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असताना संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयातच ठिय्या मांडला. नंतर एक तास झाल्यावर पटनायक यांच्यासह सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढत, कार्यालयास बाहेरून दाराला कुलूप ठोकले.
नाफेडच्या निषेधाचा फलक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच लावण्यात आला. सुमारे १० तास आंदोलन चालले. शेतकऱ्यांनी कार्यालय आवारातच दुपारचे जेवण मागविले. पेमेंट केव्हा देणार? याचे लेखी उत्तर दिल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. सकाळी ९ वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळी ५ नंतरही सुरूच होते.
आंदोलनात बाबुलाल चव्हाण, बळीराम शिरसाठ, बन्सीलाल चव्हाण, विठ्ठल बोरसे, अरुण पाटील, मोहित सूर्यवंशी, मोतीराम शिरसाठ, नीलेश जाधव, मोहित वाघ, लीलाधर देवरे, वैभव आहिरे, केतन गुप्ता, तेजस आहिरे, वैभव आहिरे, पृथ्वीराज अहिरे, विलास निकम, निंबा धामणे, गणेश देवरे, सचिन निकम, राजेंद्र देवरे, मनोहर पवार, मोतीलाल सोनवणे आदी सहभागी झाले होते.
कार्यालय आवारात दुपारी पंगत
आंदोलनासाठी सकाळी ९ वाजेपासून शेतकरी कार्यालयाच्या आवारात दाखल झाले होते. आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी दुपारचे जेवण मागविले. यावेळी शेतकऱ्यांनी पंगती करत जेवण घेतले अन् पुन्हा आंदोलनास प्रारंभ केला.
नाफेडने वजन करून कांदा खरेदी केला. हा कांदा कंपन्यांनी मोजून विक्री केलेला आहे. विक्री केलेल्या कांद्याचे पेमेंट ७२ तासांत देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, पाच महिन्यांपासून नाफेड वेळकाढूपणा करत आहे. पैसे अडकल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. नाफेडने तत्काळ पैसे न दिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. -
किरण सोनवणे, देवळा तालुका युवाध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना