

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
आगरवाडा चोपडे पंचायतीच्या उपसरपंचपदी बुधवारी संगीता गुरुदास नाईक यांची बिनविरोध निवड झाली या पंचायतीच्या सरपंचपदी शिल्पा शरद नाईक आहेत. या दोघीही सासू व सून आहेत. संगीता नाईक या यापूर्वी आगरवाडा चोपडेच्या सरपंचही होत्या. बुधवारी संगीता नाईक यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी ठाकूर यांनी जाहीर केले. त्यांना पंचायत सचिव करिष्मा मोरजकर यांनी सहाय्य केले.
बुधवारी आगरवाडा चोपडे पंचायतीच्या कार्यालयात उपसरपंचपदाची निवड करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती यावेळी सरपंच शिल्पा नाईक, पंच सदस्य संगीता नाईक, दीपाली लिंगुडकर, भगीरथ गावकर, सचिन राऊत, अँथोनी फर्नांडिस, हेमंत चोपडेकर आदी उपस्थित होते.
या पंचायतीत चार वर्षांच्या काळात ४ सरपंच झाले आहेत. यापूर्वी अँथनी फर्नांडिस, सचिन राऊत, हेमंत चोपडेकर हे सरपंच होते. सध्या शिल्पा नाईक या सरपंचपदी आहेत. त्यापूर्वी या पंचायतीच्या उपसरपंचही होत्या.
तसेच संगीता नाईक या आता या पंचायतीच्या उपसरपंच झाल्या आहेत. उर्वरित काळात सरपंचपदी शिल्पा नाईक याच राहतात की पाचवा सरपंच निवडण्यात येईल हे अद्याप समजू शकले नाही.
आगरवाडा गावात चार पंच सदस्य आहेत. तर चोपडे गावात तीन पंच सदस्य आहेत. त्यात आगरवाड्यातील पंच अँथनी फर्नांडिस सचिन राऊत व शिल्पा नाईक सरपंच झालेले आहेत तर चोपडेतील पंच हेमंत चोपडेकर यांना सरपंचपद मिळालेला आहे.