

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
एका अज्ञात व्यक्तीने बँक अधिकारी असल्याचे भासवून बनावट मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करत वास्कोतील एका रहिवाशाची २,३०,९४८ रुपयांची फसवणूक केल्याचा तक्रार नोंद करण्यात आली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, वास्कोमधील मुंडवेल येथील रहिवासी महादेव तांडेल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना ७ फेब्रुवारी रोजी १.२८ वाजता घडली. त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला.
त्याने स्वतःला बँक अधिकारी म्हणून सांगत त्यांना अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडले. खात्यातून बँकिंग व्यवहार सोपे होतील, असा दावा करून एपीके फाईल पाठवून फाईल डाऊनलोड केल्यानंतर, तक्रारदाराच्या बँक २,३०.९४८ ची रक्कम फसवणूक करून डेबिट करण्यात केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
वास्को पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम ३१९ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वास्को पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मयूर सावंत, पोलिस निरीक्षक वैभव नाईक यांच्या देखरेखीखाली आणि मुरगावचे पोलिस अधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.