

पणजी : नैऋत्य मौसमी अर्थात मान्सून ने तब्बल १६ वर्षानंतर आठ दिवस अगोदर केरळमध्ये हजेरी लावत दक्षिण भारतातील अनेक भागात पसरत गोव्यात दाखल झाला आहे. हा अलीकडच्या काळातील विक्रम आहे. गेल्या सात आठ दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून आज २५ मेसह २९ मे पर्यंत मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' असल्याची माहिती हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने दिली आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे सुरू असलेली पडझड कायम असून रस्ते खचणे, इमारतींचा भाग कोसळणे, झाडे पडणे या घटनांचा समावेश आहे.
गोवा वेधशाळेचे संचालक नहुश कुलकर्णी म्हणाले राज्यात पुढील आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. २९ मे पर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. या दरम्यानही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असून मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गेल्या २४ तासात २४.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस काणकोण येथे ५५.४ मिलिमीटर पडला आहे. त्याखालोखाल पणजी येथे ३५.६, जुने गोवे येथे ३४.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस मडगाव येथे ५६२.३ मिलिमीटर झाला असून धारबांधोडा येथे ५५७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून दाबोळी आणि मडगाव या परिसरात ५०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे.