

IMD issues red alert for Goa today. Heavy rainfall expected
पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, सकल भागांसह अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील वाहतूक थंडावली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान विभागाने आज २१ मे रोजी रेड अलर्ट जारी केला असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच, २२ आणि २३ मेसाठी ऑरेंज अलर्ट, तर २४ मे ते २७ मे दरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात भारतीय वायव्य मान्सूनच्या आगमनासह पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. किनारी भागांपासून डोंगराळ भागांपर्यंत भारी ते अतिभारी पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
निचऱ्याच्या भागात पाणी साचणे, झाडे आणि वीजखांब कोसळणे यासारख्या घटना घडण्याची शक्यता असल्याने बचाव यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. मासेमार आणि समुद्रकिनारी जाणाऱ्यांना देखील सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
काल मंगळवारपासून राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले असून रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक थंडावली आहे. याशिवाय झाडे पडणे, विजेच्या तारा तुटणे यासारख्या घटना घडल्या आहेत. पेडणे, म्हापसा, दाबोळी, केपे या भागात अति मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. आज दिवसभर ही रेड अलर्ट असल्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.