गोवा : मॉन्सूनपूर्वीच गोव्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे गोव्यातील वातावरण आल्हाददायक झाले असले, तरी विमान सेवांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे जर तुम्ही गोव्याला फिरायला जाण्याचे नियोजन करत असाल तर सध्याची हवामान परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन करा आणि विमानांचे वेळापत्रक तपासा, अशा सुचना इंडिगो एअरलाईन्सने प्रवाशांना दिल्या आहेत.
गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (दाबोलिम) मंगळवारी संध्याकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे, त्यामुळे काही विमानांना उशीर होत आहे, तर काहींचे उड्डाण वळवण्यात आले आहे. विमान कंपनीने प्रवाशांना त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्यासाठी एअरलाइनची अधिकृत वेबसाइट तपासण्याची किंवा कस्टमर केअरशी संपर्क साधण्याची विनंती केली आहे.
गोव्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) गोव्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे स्थानिक पातळीवर पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. गोव्यात काही ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही राज्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, असे आयएमडी गोव्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जर तुम्ही गोव्याला सहलीचे नियोजन करत असाल तर सध्याच्या हवामान परिस्थिती लक्षात घेऊन तुमच्या सहलीचे नियोजन करा आणि नियमितपणे फ्लाइटची स्थिती तपासत रहा.
तुमच्या फ्लाइटच्या स्थितीबद्दल माहितीसाठी एअरलाइनची वेबसाइट तपासा किंवा कस्टमर केअरशी संपर्क साधा.
विमानतळासाठी अतिरिक्त वेळ लागू शकतो. हवामानामुळे रस्त्यावरील वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो.
जर फ्लाइट बदलली किंवा रद्द केली तर एअरलाइन कर्मचाऱ्यांची मदत घ्या.
इंडिगो एअरलाइन्सने त्यांच्या प्रवाशांना संयम आणि सहकार्याचे आवाहन केले आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.