

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
मडगाव येथील नवीन घाऊक मासळी बाजाराच्या इमारतीत मार्केटमध्ये चांगल्या सुविधा प्राप्त होणार आणि घाऊक मासळी विक्रेत्यांना त्या इमारतीत मासळीचा व्यापार करता येणार, यासाठी सर्व व्यापारी आतुरतेने घाऊक मासळी बाजारच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत; परंतु घाऊक मासळी बाजाराच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला अद्याप मुहर्त मिळत नसल्याने मासळी विक्रेत्यांचा पसारा रस्त्यावर जशास तसा पडून आहे.
भाजी विक्रेते, फळ विक्रेते, तसेच चप्पल विक्रेते, प्लास्टिक साहित्य विक्रेते, यांनी रस्त्याच्या कडेला बस्तान मांडल्याने प्रचंड प्रमाणावर या बाजाराबाहेर गर्दा ओसंडलेली असते. मासळी विक्रेत्यांशी चर्चा करून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या मासळी बाजारात अन्य बेकायदा व्यवसायामुळे अतिक्रमण दिवसेंदिवस चाढत आहे.
याठिकाणी केवळ बेकायदेशीर पद्धतीने मासळी विक्रेतेच नव्हे, तर भाजी विक्रेते, फळ विक्रेते, तसेच चप्पल विक्रेते, प्लास्टिक साहित्य विक्रेते, सकाळी ७ पासुन दुपारी १२ वाजेपर्यंत ठाण मांडून बसलेले असतात.
रस्त्याच्या कडेला बसून या बेकायदेशीर विक्रेत्यांनी आपला चांगला जम बसलेला आहे. या ठिकाणी या बेकायदेशीर विक्रेत्यांना हटवण्यासाठी प्रशासन कमी पडत असल्याने हा बेकायदेशीर व्यवसाय वाढत चालला आहे, अशी माहिती स्थानिक मासळी विक्रेत्यांकडून प्राप्त झालेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दक्षिण गोवा घाऊक मासळी बाजाराचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलत गेला आहे. त्यासाठी मासळी व्यावसायिक संतप्त झाले आहेत
वाहनांचेही बेशिस्तपणे पार्किंग
मासळी व्यावसायिक यांनी, नव्याने उभारलेल्या या मासळी बाजाराच्या इमारतीत अनेक त्रुटी असल्याने या अवस्थेत नवीन इमारतीचे उद्घाटन केले तर याचा त्रास आम्हा व्यावसायिकांनाच होणार आहे. नवीन मासळी बाजार इमारतीचे उद्घाटन झाले नसल्याने बेकायदेशीर विक्रेत्यांचे आयतेच फावले आहे. या बाजारात कसलीच शिस्त राहिलेली नाही. वाहनाचे बेशिस्त पद्धतीने होणारे पार्किंग मासळी व्यवसायावर भयंकर परिणामकारक ठरत आहे, असे त्यांनी सांगितले.
वर्ष सरत आले; उद्घाटनाला मुहूर्त कधी
एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटमध्ये नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन जानेवारी महिन्याच्या शेवटी होणार होते; परंतु सांडपाणी प्रक्रियेची सुविधा, फॉर्मलीन चाचणीसाठी प्रयोगशाळा, कोल्ड स्टोरेजची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, यापैकी एकही सुविधा येथे पूर्ण न झाल्याने उद्घाटन सोहळ्याचा मुहूर्त वर्ष सरत आले तरीही हुकला आहे. तसेच बाजाराचे वातावरण गलिच्छ झाले असून, येथे प्रचंड प्रमाणावर थर्माकोलचा पसारा खितपत पडला आहे.