

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक यांनी सादर केलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी कोलवा येथील आस्थापनांवर कठोर कारवाई करत त्यांना सील करण्याचा आदेश दिला.
दोन संबंधित आस्थापने रॉयल स्पा आणि हॅपिनेस विल ग्रो युनिसेक्स सॅलून अँड स्पा अशी आहेत. दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविलेल्या अहवालात दोन्ही स्पा व सलूनमध्ये बेकायदेशीर आणि अनधिकृत प्रकारचे उपक्रम सुरू असल्याची गंभीर नोंद केली होती.
अहवालातील माहितीच्या आधारावर प्रशासनाने संबंधित ठिकाणांची पडताळणी करून पाहणी केली. तपासणीदरम्यान आस्थापनांच्या कार्यपद्धतीमध्ये गोवा सार्वजनिक आरोग्य अधिनियमाचे स्पष्ट उल्लंघन आढळले. रॉयल स्पामध्ये कलम २९ (अ), २९ (व), आणि २९ (सी) चे उल्लंघन होत असल्याचे निष्पन्न झाले.
हॅपिनेस विल ग्रो युनिसेक्स सॅलून अँड स्पा मध्ये कलम २९ (अ) चे उल्लंघन आढळले. हे कलम आरोग्य, स्वच्छता, व्यवसायांच्या नियमांचे करण्यासाठी परवानग्या आणि सुरक्षिततेसंबंधीच्या पालन सुनिश्चित लागू असतात. कारवाईदरम्यान संबंधित जागा बंद करून पुढील सूचना येईपर्यंत त्याठिकाणी कोणताही व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे.