

पणजी : पुढारी वृत्तसेवा
बार्देश तालुक्यातील हडफडे व कळंगुट येथील हॉटेलमध्ये असलेल्या दोन कॅसिनोंनी ३६ कोटी रुपयांच्या वार्षिक आवर्ती शुल्काची थकबाकी न भरल्यामुळे या दोन कॅसिनोंना तत्काळ बंद करण्याचा आदेश गृह खात्याने काढला आहे.
हा आदेश गृह खात्याचे अवर सचिव मंथन नाईक यांनी काढला आहे. पोलिसांनी बंदीची अंमलबजावणी केल्यानंतर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हडफडे येथील एका व कळंगुटमधील एका कॅसिनोचा यात समावेश आहे. या संदर्भात पोलिस महासंचालकांना आदेशाची अंमलबजावणी केल्यानंतर कृती अहवाल सादर करण्यास गृह खात्याने सांगितले आहे.
हडफडे येथील रिझोर्टमध्ये चालवल्या जाणाऱ्या कॅसिनोकडून मार्च २०२५ या वर्षाचे ३ कोटी रुपये त व त्यापुर्वीचे ११ कोटी रुपये मिळून १४ कोटी रुपयांची वार्षिक आवर्ती शुल्काची थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्याची सूचना करुनही ती भरली न गेल्याने गृह खात्याने सदर कॅसिनो तत्काळ बंद करण्याचा आदेश जारी केला आहे.
तसेच वरील थकबाकी आणि त्यावर १८ टक्के व्याजासह सात दिवसांत जमा करण्याचा आदेश जारी करण्यात आला. कळंगुट येथील कॅसिनो सुरू झाल्यापासून ते ३१ मार्च २०२६ या वर्षाचे २२ कोटी रुपये वार्षिक आवर्ती शुल्क येणे आहे. नोटीस बजावूनही ही रक्कम जमा केली नसल्याने गृह खात्याने सदर कॅसिनोही तत्काळ बंद करण्याचा आदेश जारी केला आहे.