

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
म्हापशातील २२ वर्षीय सॅम्युएल ब्रागांझा यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर झाला असून, 'टुगेदर म्हापसा' संघटनेने म्हापसा नगरपालिकेच्या प्रशासकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष अॅड. महेश राणे आणि सरचिटणीस जितेश कामत यांनी यासंदर्भात पोलिस निरीक्षकांकडे अधिकृत तक्रार दिली. तक्रारपत्रात कचरा व्यवस्थापनातील अपयश आणि प्रशासनाची दीर्घकालीन उदासीनता यामुळे शहरात अस्वच्छता वाढून नागरिकांवर मानसिक तणाव निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत स्वच्छ व निरोगी वातावरणाचा अधिकार बाधित झाल्याचेही नमूद करण्यात आले. सॅम्युएलचा मृत्यू हा कचऱ्याच्या वादातून निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम असल्याचा दावा संघटनेने केला.
संघटनेने 'गोवा नॉन-बायोडिग्रेडेबल गार्बेज (कंट्रोल) अॅक्ट, १९९६' अंतर्गत गुन्हा नोंदवून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. कचरा व्यवस्थापनाशी संबंधित नोंदी जप्त करणे, साक्षीदारांचे जबाब नोंदवणे आणि दोषींवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे अॅड. राणे यांनी सांगितले
जबाबदारी निश्चित करा
जितेश कामत यांनी या घटनेत जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी भूमिका मांडली. संबंधित व्हिडीओ तयार करणाऱ्यावरही कारवाई व्हावी, असे त्यांनी नमूद केले. विजय भिके यांनी स्थानिक आमदारांकडून पोलिसांवर दबाव टाकल्याचा तसेच शवविच्छेदन अहवालावर प्रभाव टाकण्याचा आरोप करत कॉल रेकॉर्ड्सची चौकशी करण्याची मागणी केली.