

म्हापसा : गावसावाडा, म्हापसा येथील २२ वर्षीय सॅम्युअल ब्रागांझा याचा मृतदेह कुटुंबीयांनी सोमवारी सकाळी ताब्यात घेतला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी चर्चमध्ये प्रार्थना सभा झाली असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
गावसावाडा परिसरात उघड्यावर कचरा टाकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि त्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने सॅम्युअलने शुक्रवारी गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा विविध स्तरांतून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
अंत्यसंस्कारानंतरही सॅम्युअलला न्याय मिळवण्यासाठीचा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कुटुंबीय व स्थानिकांनी व्यक्त केला. संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी तसेच व्हिडीओ चित्रीकरण करून तो व्हायरल सॅम्युअल ब्रागांझा करणाऱ्या व्यक्तीला अटक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे नेते सुनील कवठणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे. तपासासाठी नियुक्त पोलिस उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
'माझा भाऊ परत येणार नाही, पण त्याला न्याय मिळायलाच हवा,' असा आक्रोश सॅम्युअलच्या बहिणीने केला. सॅम्युअलच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या वर्तनावर गंभीर आरोप केले आहेत. चौकशीच्या नावाखाली त्याला तासन्तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले, तसेच एका बंद खोलीत नेऊन त्याच्याशी कोणती वागणूक दिली याबाबत शंका असल्याचे बहिणीने सांगितले.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने मानसिक त्रास सहन करत सॅम्युअल खचला होता, असा आरोपही करण्यात आला आहे. सॅम्युअलने देशी बनावटीच्या बंदुकीचा वापर करून आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले तरी ती बंदूक त्याच्याकडे कशी आली, याबाबत कुटुंबीयांनी अनभिज्ञता दर्शवली आहे. या प्रकरणात दोर्षीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप; लढा सुरूच
या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते जितेश कामत म्हणाले की, 'सामान्य गुन्ह्यांत विलंब करणारे पोलीस सॅम्युअलच्या प्रकरणात इतक्या घाईत कारवाई का करत होते?' पोलिसांनी संवेदनशीलतेचा अभाव दाखविल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली. या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी लवकरच पोलीस महासंचालकांची भेट घेणार असल्याचे विजय भिके व नौशाद चौधरी यांनी सांगितले. सॅम्युअलला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला