

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गावसावाडा- येथील म्हापसा २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी सॅम्युअल ब्रागांझा यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे. शवविच्छेदन अहवालात सॅम्युअलच्या डोक्याला, डोळ्याला आणि गळ्याच्या भागाला गंभीर दुखापती झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यापैकी काही जखमा मृत्यूपूर्वी सुमारे २४ तास आधी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कचरा टाकल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सॅम्युअलला चौकशीसाठी म्हापसा पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला होता.
आत्महत्येच्या निष्कर्षावर प्रश्नचिन्ह
शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर आत्महत्येच्या प्राथमिक निष्कर्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तपास यंत्रणा आता मृत्यूपूर्वी झालेल्या जखमांचा आणि घटनाक्रमाचा सखोल तपास करत आहेत.
नागरिकांचा पोलिस ठाण्यासमोर आक्रोश
सॅम्युअल ब्रागांझा यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी म्हापसा येथे पोलिस स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमले. या आंदोलनाद्वारे सॅम्युअलला न्याय मिळावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. हातात फलक आणि बॅनर घेऊन जमलेल्या आंदोलकांनी सॅम्युअलच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. शवविच्छेदन अहवालात समोर आलेल्या जखमांमुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.