

म्हापसा (पुढारी वृत्तसेवा):
गोव्यातील म्हापसा येथे गणेशपुरी परिसरात एका डॉक्टरांच्या बंगल्यावर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे ५० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान ही घटना घडली असून, या दरोड्यामुळे म्हापसा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरोडेखोर इतके निर्ढावलेले होते की, त्यांनी चोरी करताना डॉ. घाणेकर यांच्या आईकडून चहा करून घेतला आणि फ्रिजमधील फळे व इतर सामान खाल्ले. या घटनेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पोलीस महासंचालक कुमार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाचे निर्देश दिले आहेत.
गणेशपुरी येथील भर वस्तीत असलेल्या डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सुमारे पाच अज्ञात दरोडेखोरांनी खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. घरात घुसताच दरोडेखोरांनी डॉ. घाणेकर, त्यांची पत्नी, मुलगी आणि आई यांना चादरींच्या साहाय्याने बांधून ठेवले. त्यांनी डॉ. घाणेकर यांना मारहाण केली आणि दागिने मागितले.
दागिने बँकेच्या लॉकरमध्ये असल्याचे कळल्यावर दरोडेखोरांनी संपूर्ण घरात उलथापालथ करून दीड लाख रुपयांची रोख रक्कम चोरली. याशिवाय, त्यांनी कुटुंबाच्या अंगावरील दागिनेही जबरदस्तीने काढून घेतले आणि कुटुंबातील सदस्यांना बाथरूममध्ये डांबून टाकले. एकूण सुमारे ५० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दरोडेखोरांच्या क्रूरतेसोबतच त्यांच्या निर्ढावलेल्या वृत्तीचा अनुभवही या घटनेतून आला. सुमारे दोन तास (पहाटे ५ वाजेपर्यंत) घरात धुमाकूळ घालत असताना, दरोडेखोरांनी डॉ. घाणेकर यांच्या आईकडून चहा करून घेतला आणि फ्रिजमधील फळे व इतर सामान खाल्ले.
जाताना त्यांनी आपली ओळख लपवण्यासाठी घरातील सीसीटीव्ही रेकॉर्डरही चोरला. एवढेच नाही, तर त्यांनी डॉ. घाणेकर यांची GA03P7187 क्रमांकाची अल्टो कार चोरून नेली. ही कार मात्र दुपारी पणजी पुलाखाली सोडून देण्यात आल्याचे पोलिसांना नंतर समजले.
घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी तातडीने उपअधीक्षक विल्सन डिसोजा आणि निरीक्षक निखिल पालेकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकही पाचारण करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दुपारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पोलीस महासंचालक कुमार यांनी डॉ. घाणेकर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना या दरोड्याबाबत लवकरात लवकर कारवाई आणि चौकशी करण्याचे निर्देश दिले. तसेच, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी नाकाबंदी वाढवण्याचे आणि रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात आले आहेत. या घटनेमुळे गोव्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलीस आता दरोडेखोरांचा कसून शोध घेत आहेत.