

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
विद्यार्थिनीचा मासिक पाळीचा रक्तस्त्राव गणवेशावर उमटेपर्यंत शिक्षिकेने शिक्षा पूर्ण करण्याचे फर्मावणे हा अमानुषतेची मर्यादा ओलांडणारा छळ आहे. विद्यार्थिनीवर झालेला हा अत्याचार तिच्यासाठी अत्यंत मानसिक आघात आहे. पालकांनी याविषयी कोणत्याही प्रकारची चिंता न करता तक्रार दाखल करावी.
आम्ही पुढील कारवाई करणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रंजिता पै यांनी म्हटले आहे. मडगावातील एका विद्यार्थिनीला शिक्षा देण्याच्या निमित्ताने, शाळेत तिच्या वेदनेचं ओझं दुप्पट करून मानसिक छळाचा सामना करावा लागण्याची घटना समोर येताच प्रशासनाने या विरोधात गंभीर दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे.
मडगाव येथील मासिक पाळीचा रक्तस्त्राव गणवेशावर उमटला तरीही शिक्षिकेने शिक्षा पूर्ण करण्याचे फर्मावल्याच्या प्रकाराची शिक्षण खात्यासोबतच महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे.
राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केल्यास आम्हीही या प्रकाराची कारवाई करणार असल्याचे अध्यक्षा रंजिता पै त्यांनी सांगितले. मानसिक आघात झालेल्या त्या अल्पवयीन विद्यार्थिनीला वारंवार समुपदेशन करण्याच्यानिमित्ताने शिक्षकांना स्पष्टीकरण देण्यास लावत असल्यास हा प्रकार अजूनही गंभीर आहे.
शाळेत हा प्रकार वारंवार घडत असल्याने ती अल्पवयीन विद्यार्थिनी मानसिक तणावात वावरत आहे. वास्तविक समुपदेशनाची खरी गरज विद्यार्थिनींचे छळ करणाऱ्या शिक्षकांना आहे. शिक्षकांकडून अशा प्रकारे मुलांचे छळ होणे अत्यंत गंभीर प्रकार असून यापुढे याची दखल घेऊन अशा घटना यापुढे होऊ नये त्यासाठी शिक्षकांसाठी खास समुपदेशनाचे उपक्रम शाळेत राबविले जाणार असल्याचे पै यांनी सांगितले.
शिक्षिकेला निलंबित करा...
विद्यार्थिनीबाबत घटलेली घटना अतिशय वाईट आहे. शाळा सरकारी असो किंवा सरकारी अनुदानित असो तेथील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी संयमाने काम करणे आवश्यक आहे.
शिक्षक जर विद्यार्थ्यांच्या हिताविरोधात वागू लागले तर विद्यार्थी शाळेतच येणार नाही. सरकारने सदर शिक्षिकेला निलंबित करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी केली.