पणजी : पुढारी वृत्तसेवा
५२ व्या इफफीमध्ये प्रतिनिधींना खाजगी सुरक्षा रक्षकांच्या वाईट वागणुकीचा अनुभव येत असतानाच प्रख्यात अभिनेता मनोज वायपेयी यांनाही त्यांच्या उर्मटपणाला सामोरे जावे लागले. यावेळी चिडलेल्या मनोज वायपेयी (Manoj Bajpayee) यांनी सुरक्षा रक्षकांना चांगलीच समज दिली. शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान वायपेयी आपल्या कुटुंबासह आयनॉक्स परिसरात दाखल झाले. त्यांना स्क्रीन ३ मध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते. तरीही थंडर फोर्सच्या खाजगी सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत सोडण्यासाठी रांगेत उभे राहण्यास सांगितले.
कार्ड स्कॅन करून आत जाताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना पुन्हा हटकले व त्यांच्याजवळ असलेली बॅग बाहेर ठेऊन आता जाण्यास सांगितले. यावेळी वायपेयी (Manoj Bajpayee) यांनी आपण इथे पाहुणा म्हणून आलो असल्याचे सांगितले. तसेच अस्सल हिंदी भाषेत माझी बॅग आता जाणार नसेल तर मीही जाणार नाही असेही सांगितले. मला पाहुणा म्हणून बोलावता आणि अशी वागणूक देता का ? असा प्रश्न त्यांनी विचारला. अखेर एका मदतनीसाला ते अभिनेते असल्याचे समजल्यावर त्याने सुरक्षा रक्षकांना त्यांना आत सोडण्याच्या सूचना दिल्या.
यंदाच्या इफफीमध्ये मनोरंजन संस्थेच्या आवारातील सुरक्षेचे काम पणजी येथील थंडर फोर्स या खाजगी सुरक्षा रक्षक कंपनीला दिले आहे. आयनॉक्स चित्रपटगृहाचे प्रवेशद्वार,मॅकीनिझ पॅलेस आणि अन्य ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षकांना तैनात केले आहे. हे रक्षक उद्धटपणे वागत असल्याची तक्रार अनेक प्रतिनिधींनी याआधीही केली होती. प्रतिनिधींच्या अंगावर धावून जाणे, जोरात खेकसणे, विनाकारण हटकणे असले प्रकार घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी एका प्रतिनिधीला तर या सुरक्षा रक्षकांनी शिवीगाळ केली. त्याने आवाज वाढल्यावर आयनॉक्स परिसरात गर्दी जमली. अखेर आवारातील पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर मात्र खाजगी रक्षक नरमले.
थंडर फोर्सच्या सुरक्षा राक्षकांचा माध्यम प्रतिनिधींनाही कटू अनुभव आला आहे. रेड कार्पेट हा इव्हेंट कव्हर करताना अनेक माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आला. पत्रकार असल्याचे ओळखपत्र दाखवूनही त्यांना इव्हेंट कव्हर करू दिला गेला नाही. यावरून माध्यम प्रतिनिधी आणि सुरक्षा राक्षकांत वादावादी झाली होती.
सुभाष फळदेसाई, उपाध्यक्ष गोवा मनोरंजन संस्था
प्रतिनिधींना चांगली वागणूक देणे आवश्यक
खाजगी सुरक्षा रक्षक उद्धटपणे वागत असल्याची कोणतीही लेखी किंवा तोंडी तक्रार आलेली नाही. पण असे काही झाले असेल तर सबंधितांशी बोलून प्रतिनिधींनिंसोबत चांगली वागणूक करण्याची सूचना देण्यात येईल. इफफीला येणाऱ्या प्रतिनिधींसोबत आदराने वागणे आवश्यक आहे.