

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सरकारने माझे घर योजना आणून राज्यातील अनेकांना दिलासा दिला आहे. सरकारी व कोमुनिदाद जमिनीत अतिक्रमण करून घरे बांधलेल्यांवर असलेली टांगती तलावर दूर झाली आहे. या मालकांना त्यांचा मालकी हक्क मिळवून देण्यात सरकारने पावले उचलल्याबद्दल सत्ताधारी आमदार रुदॉल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई व संकल्प आमोणकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभारप्रदर्शनावरील चर्चेवेळी कौतुक केले.
दिवाडी ते जुनेगोवे या जलमार्गावर दोन रो रो फेरीबोटी डिसेंबरपूर्वी सुरू कराव्यात. दिवाडी बेटावर जाणाऱ्या पर्यटक वाहनांची संख्या वाढत असल्याने सध्या ३ फेरीबोटी सकाळी व सायंकाळी ३ तास चालविल्या जातात, त्या कमी पडत आहेत. त्या सतत सुरू ठेवण्याची विनंती आमदार राजेश फळदेसाई यांनी केली.
माझे घर योजनेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून घराची मालकी मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्यांना दिलासा मिळाला आहे. देवदर्शन योजनेसाठी असलेली वयोमर्यादा किमान ५२ वर्षऐिवजी ती १८ वर्षे व त्यावरील लोकांना उपलब्ध करावी. सांतइस्तेव जुवे येथील पाण्याचे पाईप तसेच भूमिगत वीजवाहिनीचे पाईप घालण्याचे काम लवकर पूर्ण करावे जेणेकरून तेथे रस्त्यांचे डांबरीकरण करता येईल. दिवाडी येथील मैदानाचे काम पूर्ण करण्याची डेडलाईन १५ ऑगस्ट २०२६ असून सध्याची कामाची गती पाहिल्यास ते आणखी काही वर्षे शक्य नाही. त्यामुळे संबंधित मंत्र्यांनी कंत्राटदाराला वेळमर्यादा घालून द्यावी.
कुंभारजुवे दिवाडी येथील शेताचे बांध फुटल्याने तेथील शेते पाण्याखाली गेली होती. मुड्ढेर येथे हल्लीच बांध फुटल्याने तेथील शेती व्यवसायावर परिणाम झाला आहे त्यामुळे या बांधाची डागडुजी लवकर करण्याची विनंती त्यांनी यावेळी चर्चेवेळी केली. सांताक्रुझचे आमदार रुदॉल्फ फर्नांडिस यांनी सरकारने राबविलेल्या विविध योजनांबद्दल तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासकामांसाठी वाहून घेतल्याबद्दल कौतुक केले.
रोजगाराच्या संधी, पारदर्शक सरकारी नोकरभरती तसेच महिलांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वयंसहाय्य गटाच्या महिलांना राष्ट्रीय स्तरावर माल विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध केले आहे. गोवा मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या सुरक्षा पदासाठी वयोमर्यादा ४५ आहे ती सरकारने वाढवावी जेणेकरून बेरोजगारांना संधी मिळेल, असे ते म्हणाले.
देवदर्शन योजनेचा फायदा
सांताक्क्रुझमध्ये दोन मैदाने तयार करण्याचे काम सुरू आहे. देवदर्शन ही चांगली योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केली. ज्यामुळे ज्यांना वालंकिणी, अयोध्या व शिर्डी येथे देवदर्शन करणे शक्य झाले. कृषीला सरकारने प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे सांताक्रुझ मतदारसंघात कॉक्रिटीकरणापेक्षा शेतीव्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे, असे फर्नांडिस म्हणाले.
मुरगाव मतदारसंघातील लोकांना जास्त फायदा
राज्यपालांच्या अभिभाषणात सरकारने केलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावर सभागृहात सदस्य बोलले आहेत. माझे घर योजनेचा अधिक फायदा मुरगाव मतदारसंघातील लोकांना झाला आहे. सुमारे ९० टक्के लोकांची घरे ही सरकारी जमिनीत असल्याने त्यांना या योजनेमुळे समाधान मिळाले आहे. त्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांना जाते. मुरगाव येथील तारीवाडा येथील घरे पुनर्वसन मंडळाने त्यांच्या नावावर करावीत. १९७२ पूर्वीची घरांना मुरगाव बंदर प्राधिकरणाने (एमपीए) नोटीस बजावल्या आहेत. सरकारने या प्राधिकरणाला जमीन दिली होती व आता या लोकांना तेथून घरे हटवण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने यासंदर्भात लक्ष देण्याची गरज असल्याचे आमदार संकल्प आमोणकर म्हणाले.