

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
गोमंतक भूमीत आलेले मोठमोठे राजे नेते नेस्तनाबूत झाले आहे, तसा इतिहास आहे. त्यामुळे सत्तेचा गर्व कोणी करू नये. जनतेला गृहीत धरू नका. गोमंतकीय जनतेचे म्हणणे ऐकावेच लागेल. गोव्यात जे सुरू आहे ते आणखी सहन होणारे नाही.
गोव्यातील जनता काय आहे, हे आम्ही दाखवून देऊ, असा इशारा माजी न्यायमूर्ती फेर्दीन रिबेलो यांनी म्हापसा येथे दिला. माजी न्यायमूर्ती फेर्दीन रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली 'इनफ इज इनफ' या बॅनरखारी सुरू असलेल्या जन आंदोलनाचा एक भाग म्हणून म्हापसा येथील कोमुनीदाद सभागृहात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी स्मिता शिरोडकर, धिरेन फडते, समीर गोवेकर, मयूर शेटगावकर, स्वप्नेश शेर्लेकर उपस्थित होते.
रिबेलो म्हणाले, सुरू असलेली ही आपली लढाई गोव्याच्या अस्तित्वासाठीची आहे. सध्या भोम, चिंबलचे रहिवासी आपल्या अस्तित्वासाठी व जैवविविधतेच्या रक्षणासाठी लढा देत आहेत. स्वप्नेश शेर्लेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप पाडगावकर यांनी कविता सादर केली, तर, तोमाझीन कार्दोज यांनी कांतार सादर केले. सूत्रसंचालन किशोर नाईक गावकर यांनी केले.