

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
तुये हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलला लिंक व्हावे, यासाठी सुरू असलेले साखळी उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच होते. हा विषय कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या विरोधात नसून हा विषय सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी निगडित असल्यामुळे तुये हॉस्पिटल कृती समितीने हा लढा उभारला आहे. या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून गुरुवारी १५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता तुये आयटीआय ते तुये हॉस्पिटलपर्यंत मशाल मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. ३० रोजी तुये हॉस्पिटलच्या नवीन इमारतीत सामुदायिक आरोग्य केंद्र स्थलांतरित केले आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा नेण्याचा इशारा तुये हॉस्पिटल कृती समितीने दिला आहे. यावेळी तुये हॉस्पिटल कृती समितीचे निमंत्रक जुझे लोबो, पंच प्रशांत नाईक, जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कळशावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य अरुण बानकर, जगन्नाथ पार्सेकर व्यंकटेश नाईक, अॅड. सदानंद वायंगणकर, देवेंद्र प्रभुदेसाई, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर, तुळशीदास राऊत, उल्हास नाईक, माजी सरपंच नीलेश कांदोळकर, सुनिल नाईक व आदी उपस्थित होते. प्रशांत नाईक म्हणाले, जनकल्याणासाठी तुये हॉस्पिटल गोमेकॉला लिंक करावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत ते हॉस्पिटल पूर्ण होत नाही आणि आरोग्य खात्याच्या ताब्यात येत नाही. तोपर्यंत आपण ते हॉस्पिटल सुरू करणार नाही, असे मंत्री विश्वजित राणे म्हणाले होते. मग ३० रोजी अचानक हॉस्पिटल सुरू करण्याचे कसे ठरवले, असा प्रश्नही त्यांनी केला. आमदार जीत आरोलकर यांनी शून्य प्रहरमध्ये तुये हॉस्पिटलचा विषय आणि आंदोलन कर्त्यांची भावना विधानसभेत मांडली. त्यामुळे आमदार आरोलकर यांचे अभिनंदन करण्यात आले. देवेंद्र प्रभुदेसाई म्हणाले, ज्या पद्धतीने पार्सेकर यांनी हॉस्पिटल हे बांबोळी हॉस्पिटल ला लिक करण्याची योजना आखून उभारले होते. त्याच पद्धतीने ते हॉस्पिटल लिंक हॉस्पिटल म्हणून सरकारने सुरू करावे. ते घाई गडबडीत करू नये. जर ३० रोजी सामुदायिक आरोग्य केंद्र नवीन हॉस्पिटल मध्ये स्थलांतरित केले. तर तीव्र आंदोलन करण्याची तयारी कृती समितीने ठेवल्याचा इशारा यावेळी देवेंद्र प्रभुदेसाई यांनी दिला. तुये हॉस्पिटल कृती समितीचे जुझे लोबो म्हणाले, विधानसभेत प्रश्न चिरल्यानंतर सत्ताधिकाऱ्यांनी आमदार आरोलकर यांचा अवमान केला आहे. हा अवमान केवळ आमदाराचा नसून पेडणेवासीयांचा आहे. त्यामुळे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो.
मशाल मिरवणूक यशस्वी करा...
मशाल मिरवणुकीला सर्व सरपंच, उपसरपंच, पंच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, आमदार, निवडून आलेले चारही जिल्हा पंचायत सदस्य, आजी-माजी सदस्य माजी आमदारांनी उपस्थिती लावून ही मशाल मिरवणूक यशस्वी करावी, असे आवाहन यावेळी जुझे लोबो यांनी केले.