

पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबसाठी अबकारी परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राचा बोगस ना हरकत दाखल्याचा (एनओसी) वापर केल्याप्रकरणी जीएस हॉस्पिटॅलिटी या गौरव व सौरव लुथरा बंधूंच्या कंपनीविरुद्ध म्हापसा पोलिसांनी बनवेगिरीचा गुन्हा नोंद केला आहे.
त्यामुळे या पोलिसांनी त्यांच्या लुथरा बंधूंच्या ट्रान्सिट रिमांडसाठी न्यायालयात अर्ज केला आहे. हणजूण दुर्घटनेच्या प्रकरणात लुथरा बंधूंना म्हापसा न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे तर संशयित अजय गुप्ता याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दरम्यान, गेल्या मंगळवारी (१६ डिसेंबर) गोव्यात आणलेल्या लुथरा बंधूंची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने न्यायालयात ही कोठडी वाढवून देण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला.
संशयित लुथरा बंधू तपासकामात सहकार्य करत नाहीत. त्यांनी केलेल्या बनावट करारपत्राच्या दस्तावेज तसेच काही दस्तावेजसंदर्भात स्पष्टीकरण त्यांच्याकडून मिळत नाही. बनावट दस्तावेजाची प्रतची माहितीही उघड केलेली नाही. त्यामुळे त्यांना ९ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती हणजूण पोलिसांनी केली.
म्हापसा न्यायालयाने लुथरा बंधूंच्या पोलिस कोठडीत ४ दिवसांनी वाढ केली आहे. दरम्यान, लुथरा बंधू यांच्या नाईट क्लबमध्ये व्यवसाय भागिदार असलेला संशयित अजय गुप्ता याची न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा त्याचा या हडफडे दुर्घटनेशी काही संबंध नसल्याचा तसेच त्याने लुथरा बंधूंच्या या व्यवसायात पैसे गुंतवणूक केल्याने नाममात्र भागिदार असल्याचे न्यायालयात जात असताना पत्रकारांना सांगितले होते.
दिल्ली पोलिसांची 'एनओसी' ही बनावट
हणजूण पोलिसांनी लुथरा बंधू यांच्या केलेल्या चौकशीत त्यानी केलेल्या बनावट दाखल्यांची प्रकरणे समोर येत आहे. या नाईट क्लबसाठी केलेले करारपत्रपाठोपाठ अबकारी परवान्यासाठी आरोग्य केंद्राचा बनावट दाखल तयार केला होता. त्यांनी दिल्ली पोलिसांचा ना हरकत दाखलाही (एनओसी) बनावट केला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.