

वास्को : पुढारी वृत्तसेवा
पावसाने पुन्हा हजेरी लावल्यानंतर येथील गळक्या बसगाड्यांमुळे प्रवाशांची चिंता वाढली आहे. विविध मार्गावर धावणाऱ्या कदंब तसेच खासगी बसगाड्यांची वाहतूक खात्याच्या निरीक्षकांकडून सखोल तपासणी करण्याची मागणी होत आहे. ज्या बसगाड्यांमध्ये गळतीची समस्या आहे, त्यांची तातडीने दुरुस्ती करून संबंधितांवर कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
प्रवाशांना सुरक्षित व दर्जेदार सेवा मिळावी यासाठी बसमालकांसह वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. एखादा मोठा अपघात घडल्यानंतर काही दिवस खासगी बसगाड्यांची तपासणी, दंडात्मक कारवाई आणि तगादा लावण्याचे प्रकार दिसून येतात. मात्र, काही दिवसांनंतर परिस्थिती पूर्ववत होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. येथील विविध मार्गावर धावणाऱ्या काही बसगाड्यांमध्ये पावसाळ्यात गळती सुरू होते.
ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्याऐवजी तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात असल्याचे दिसून येते. एका खासगी मिनीबसमध्ये छताला गळती लागल्याने आसनासमोर पावसाचे पाणी साचून चिखल तयार झाला आहे. बसमालकांकडून दखल घेतली जात नसल्याने प्रवाशांना चिखलातूनच वावरावे लागत आहे. तसेच संबंधित आसनावर बसणाऱ्या प्रवाशांना भिजण्याची वेळ येत आहे.
या बसच्या मागील चाकावरील पत्र्याचा काही भाग निखळलेला असून उर्वरित भागही तुटण्याच्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वाहनांची वाहतूक खात्याच्या वास्को कार्यालयातील अधिकारी तपासणी करतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्यापूर्वी विविध वाहनांची तपासणी करण्यात येणार असल्याची घोषणा वाहतूक खात्याकडून करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात किती वाहनांची तपासणी झाली याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. काही मोठ्या व मिनी बसगाड्यांचे टायर झिजलेले असल्याचेही दिसून येत असून, याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
मोठ्या आवाजातील गाण्यांचा त्रास
काही बसगाड्यांमध्ये स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात असल्याने अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्रकारे मोठ्या आवाजात गाणी वाजविण्यास वाहतूक खात्याने परवानगी दिली आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.