

पणजी : पुढारी वृत्तसेवा
केपे, सांगे, काणकोण व धारबांदोडा या चार तालुक्यांचा मिळून तिसरा जिल्हा कुशावती स्थापन झालेला आहे. हा कुशावती जिल्हा म्हणजे या चारही तालुक्यांतील ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासाचे नवे द्वार ठरणार आहे, असे प्रतिपादन समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले.
पणजी येथे शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष दामू नाईक, माजी खासदार व माजी मंत्री विनय तेंडुलकर, माजी मंत्री व विद्यमान आमदार नीलेश काब्राल उपस्थित होते. यावेळी बोलताना फळदेसाई म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागाचा चांगल्या प्रकारे विकास व्हावा, प्रशासन तळागाळात सुलभपणे पोहोचावे यासाठी देशभरामध्ये ११२ नवे जिल्हे स्थापन करण्याची घोषणा केली होती, त्या अंतर्गत गोव्यामध्ये हा तिसरा जिल्हा स्थापन झाला आहे.
हा जिल्हा ग्रामीण लोकांसाठी विकासाचे दालन ठरेल. विशेषतः या जिल्ह्यातील एक तृतियांश असलेल्या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यास नवी जिल्हा कउपयुक्त ठरणार असल्याचे फळदेसाई म्हणाले. तिसरा जिल्हा व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून सुरू होती, तिसरा जिल्हा स्थापन होतानाच नव्या सुविधा येतील, उच्च शिक्षण, आरोग्य, न्यायलये व प्रशासनाचे प्रकल्प स्थापन होतील, वाहतूक व्यवस्था होईल.
असे सांगून कुशावती नदीला दहा हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे ते नाव देणे योग्यच असल्याचे फळदेसाई म्हणाले. याप्रसंगी बोलताना दामू नाईक म्हणाले की, तिसरा जिल्हा ही नव्या वर्षात गोवेकरांना भाजप सरकारने दिलेली भेट आहे, अनेक वर्षाची मागणी मान्य झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या माध्यमातून तिसरा जिल्हा स्थापन करण्याची योजना सफल केली त्याबद्दल प्रदेश भाजपतर्फे या दोन्ही नेत्यांचे आणि भाजप सरकारचे आम्ही अभिनंदन करत असल्याचे नाईक म्हणाले. या जिल्ह्यासाठी लवकरच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल आणि त्यानंतर पायाभूत सुविधांचे, इमारतींचे बांधकाम सुरू होणार असल्याचे सांगून या जिल्ह्याच्या माध्यमातून जैवविविधता, जंगल, पर्यावरण संभाळून विकास होणार असल्याचे एका प्रश्नावर बोलताना नाईक म्हणाले
. काही लोक प्रत्येक गोष्टीला विरोध करतात, मात्र नंतर त्याच प्रकल्पाचा लाभ घेतात. अटल सेतू, मोपा विमानतळ ही उदाहरणे आहेत. त्याच व्यक्ती कुशवती जिल्ह्याला विरोध करत आहेत, मात्र जिल्हा स्थापन झाला आहे. असे नाईक विरोधकांच्या विरोधावर बोलताना म्हणाले. कुशावती जिल्ह्याचे फायदे येत्या काळात नव्या पिढीला मिळणार आहेत.
सध्या जनगणना सुरू असल्यामुळे नेमकी गोव्याची लोकसंख्या येत्या काळात कळेल, त्याचबरोबर आदिवासी नागरिकांची संख्या किती हेही कळेल आणि त्यानंतरच एसटी राजकीय आरक्षणाबाबतही निर्णय होणार असल्याचे नाईक यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. निलेश काब्राल यांनी सांगितले की विधानसभेमध्ये चर्चा होऊन व मान्यता मिळून कुशावती जिल्हा स्थापन झाला आहे, हा जिल्हा म्हणजे आदिवासींच्या विकासाची सुरुवात आहे.
एका जिल्ह्याला हव्या असलेल्या सर्व सुविधा येथे निर्माण होणार आहेत व लोकांना त्याचा फायदा होईल व मडगावला जाण्याचा त्रास वाचेल असे सांगून केपे येथे मोठ्या प्रमाणात सरकारची जमीन असल्याने येथे प्रशासकीय प्रकल्प उभारण्यास जागा कमी पडणार नसल्याचे काब्राल म्हणाले.
विकासासाठी तिसरा जिल्हा उपयुक्त : तवडकर
सांगे, केपे, धारबांदोडा आणि काणकोण हे तालुके आजही विकासाच्या बाबतीत मागे असून, या भागांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रस्तावित तिसरा जिल्हा उपयुक्त ठरल, असे प्रतिपादन क्रिडामंत्री व काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी म्हटले आहे. तिसऱ्या प्रस्तावित जिल्ह्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, कृषी, पर्यटन तसच रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर केपेचे माजी आमदार बाबू कवळेकर यांनी कुशावती जिल्ह्याच्या निर्मितीमुळे चारही तालुक्यातील लोकांचे जीवनमान सुधारेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.