

किनवट, दि. 3 (प्रतिनिधी) :
एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पिडितेने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष हजर राहून तक्रार दिल्यानंतर किनवट पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेने दखल घेत अवघ्या 24 तासांच्या आत दोषारोपपत्र दाखल केल्याने पोलिसांच्या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सातच्या सुमारास आरोपीच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर घडलेल्या घटनेनंतर पिडित अल्पवयीन मुलीने किनवट पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यावरून 1 जानेवारी 2026 रोजी पहाटे गुन्हा क्रमांक 01/2026 नोंदविण्यात आला. सदर गुन्हा भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 74, 79 तसेच पोक्सो कायद्यातील कलम 8 व 12 अन्वये दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या आदेशाने तपासाची जबाबदारी उपनिरीक्षक देवानंद फडेवार यांच्याकडे देण्यात आली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास पथकाने तात्काळ कार्यवाही करत आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले.
पोलिसांच्या या सर्व गतीमान कारवाईमध्ये पोउपनि. एस. एस. झाडे, पोहेकॉ. जी. एस. डुकरे, पोहेकॉ. आत्राम (क्राईम विभाग), पोहेकॉ. वाघमारे, पोकॉ. सुनिल अन्नमवार, पोकॉ. माहोरे, पोहेकॉ. सिटीकर (सायबर सेल), पोकॉ. वाघमारे (कोर्ट पेरवी) तसेच पोकॉ. कुरे यांचा मोलाचा सहभाग होता.
तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब नोंदविणे, घटनास्थळ पंचनामा, तांत्रिक व दस्तऐवजी पुरावे संकलन तसेच ई-साक्ष प्रणालीद्वारे आवश्यक जप्ती पंचनामे पूर्ण करण्यात आले. या सर्व कार्यवाहीच्या आधारे आरोपीविरुद्ध अवघ्या 24 तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
महिला व अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून संवेदनशील व प्रभावी तपास करण्याच्या ‘मिशन निर्भया’ व ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करत किनवट पोलिसांनी केलेल्या या जलद कार्यवाहीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचे विशेष कौतुक केले आहे.