

माशेल : पुढारी वृत्तसेवा
कुंभारजुवे येथील काही बस चालकांच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासात्ला सामोरे जावे लागत आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कुंभारजुवे-पणजी तसेच कुंभारजुवे-फोंडा मार्गावर धावणाऱ्या काही खासगी बसेस नियोजित वेळापत्रकानुसार फेऱ्या मारत नाहीत.
विशेषतः दुपारी २ ते सायंकाळी ४.३० या कालावधीत प्रवाशांची संख्या कमी असल्याचे कारण देत काही बस चालक सेवा बंद ठेवतात. काही वेळा बस चालक कुंभारजुवे बसस्थानकापर्यंत येतात; मात्र तेथून गावातील अंतर्गत भागात जात नाहीत. त्यामुळे गावातील विविध वाड्यांवरील नागरिकांना पायी प्रवास करावा लागतो.
दुपारच्या वेळेत माशेलहून कुंभारजुवे किंवा कुंभारजुवेहून माशेल येथे जाण्यासाठी नागरिकांना मोटारसायकल पायलट, रिक्षा किंवा लिफ्ट यांचाच आधार घ्यावा लागतो. विशेष म्हणजे सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४.३० नंतर या बसेस नियमितपणे धावत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे दुपारच्या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी कदंब परिवहन महामंडळाची बस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. अशी व्यवस्था झाल्यास नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळेल.
बस चालकांचा अनियमितपणा आणि कामचुकारपणा सहन केला जाणार नाही. बस मालकांना यापूर्वीही सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांची कोणत्याही परिस्थितीत गैरसोय होता कामा नये. एखाद्या चालकाला किंवा मालकाला सेवा चालवणे परवडत नसेल, तर त्यांनी तसे स्पष्ट सांगावे. त्यांच्या जागी पर्यायी व्यवस्था करण्यास आम्ही तयार आहोत.
राजेश फळदेसाई आमदार
शाळा दुपारी १.४५ वाजता सुटते. तेथून बसस्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी किमान दहा मिनिटे लागतात. त्यामुळे १.४५ वाजताची बस चुकल्यास कुंभारजुवे गावापर्यंत तीन ते चार किलोमीटर अंतर दुपारच्या कडक उन्हात किंवा मुसळधार पावसात उपाशीपोटी पायी चालत जावे लागते. सरकारने दुपारी दोननंतर कुंभारजुवेकडे जाणाऱ्या बससेवेची व्यवस्था करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
खांडोळा उच्च माध्यमिकचे विद्यार्थी