

पणजी : पुढारी वृत्तसेवा
येथील एका हॉटेलमध्ये खोली क्रमांक १०५ मध्ये राहणाऱ्या पर्यटकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत हॉटेलचा कर्मचारी विशाल यांनी पोलिसांना माहिती दिली. खोली क्रमांक १०५ मध्ये एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिल्यानंतर, पणजी पोलिस ठाण्यात कलम १९४ बीएनएसएस अंतर्गत अन्वेषण नोंद क्र. ४७/२०२६ दाखल करण्यात आली.
त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक नितीन नाईक यांनी कर्मचारी पीसी ७९३७ आणि ९७२९ यांच्यासह पडताळणीसाठी घटनास्थळी भेट दिली. चौकशीअंती असे उघड झाले की, पोलिस उपनिरीक्षक नितीन नाईक घटनास्थळावर गेले असता, हॉटेलच्या खोलीतील छताच्या पंख्याला एक पुरुष व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. हॉटेल कर्मचारी आणि मालकिणीकडे चौकशी केली असता, त्यांनी आधार कार्ड सादर केले.
यावरून मृत व्यक्ती संगण्णा बसवंतप्पा साली (वय ५५, रा. बसवन्ना फिरोजाबाद, गुलबर्गा, कर्नाटक) असल्याचे उघड झाले. संगण्णा राहत असलेली खोली आतून बंद होती व आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी कुलूप तोडून दरवाजा उघडला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी बांबोळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलात पाठविला. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास नितीन नाईक करीत आहेत.