

पुणे: नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याने पीडितेला दुपारी ३ वाजून १२ मिनिटांनी घटनास्थळाकडे नेले. त्यानंतर, दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांनी तो त्याच घटनास्थळावरून एकटाच परत येत असल्याचे त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येते. या तांत्रिक पुराव्यावरून पीडिता ही ३९ मिनिटे आरोपीच्या ताब्यात होती, हे सिद्ध होते. यादरम्यान त्याने पीडितेवर अत्यंत पाशवी व अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर, तिची निर्घृण हत्या करून मृतदेह लवपून ठेवल्याची माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयाला दिली.
याप्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात सुरू आहे. शनिवारी (दि. २०) झालेल्या अंतिम युक्तिवादादरम्यान ॲड. मिसर आणि त्यांचे सहकारी ॲड. प्रथमेश शिंगणे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे न्यायालयासमोर ठेवले. पीडितेच्या मृत्यूनंतरही आरोपीने निर्लज्जपणे तिच्या मृतदेहावर अत्याचार केले. त्याने केलेले कृत्य कोणत्याही रागाच्या भरात न करता, अतिशय थंड डोक्याने, विचारपूर्वक आणि केवळ वासनेपोटी केले आहे. अशा क्रूर कृत्यामुळे समाजावर अत्यंत विपरीत आणि घातक परिणाम होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे आरोपीवर लावण्यात आलेल्या प्रत्येक कायदेशीर कलमाची व्याख्या स्पष्ट करीत तपास यंत्रणेने गोळा केलेल्या ६ अत्यंत महत्त्वपूर्ण सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत गुन्ह्याचा घटनाक्रम मांडला. शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय दाखले आणि तिच्या शरीरावरील जखमांचे सविस्तर विश्लेषण करून त्या ३९ मिनिटांत झालेल्या अत्याचारांचे पुरावे या वेळी सादर करण्यात आले. या वेळी सीसीटीव्ही फुटेज, डीएनए रिपोर्ट आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीचा खोटेपणा उघडून पाडत, संपूर्ण दोषारोप सिद्ध करीत त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ॲड. मिसर यांनी केली.
आरोपीच्या खोटेपणाचा पर्दाफाश
डीएनए पुराव्याने गुन्ह्यातील सहभाग सिद्ध हे ठरले महत्त्वाचे पुरावे
गुन्ह्यापूर्वी आरोपीने घटनास्थळ व परिसरातील घरांची रेकी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले.
मुख्य साक्षीदार आणि बालसाक्षीदार यांनी दिलेले जबाब सरकार पक्षासाठी महत्त्वाचे आणि कायदेशीरदृष्ट्या भक्कम ठरले
घटनास्थळ पंचनामे, आरोपीची ओळख परेड, जप्त मुद्देमाल आणि रासायनिक विश्लेषण अहवाल यांमधून गुन्ह्याची साखळी सिद्ध झाली.
तपासातील 'चेन ऑफ कस्टडी' अखंड असल्याने पुराव्यांमध्ये कोणतीही छेडछाड झालेली नसल्याचेही स्पष्ट झाले.
२५ जूनला लागणार निकाल
नसरापूर अत्याचार प्रकरणाची विशेष न्यायालयात नियमित सुनावणी सुरू आहे. या खटल्यात अवघ्या १६ दिवसांत साक्षीदारांच्या साक्षी व पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर २० दिवसांत अंतिम युक्तिवादही पूर्ण करण्यात आला. शनिवारी (दि. २०) सरकारी व बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद संपला आहे. या प्रकरणाचा निकाल २५ जून रोजी जाहीर होणार असून, हा खटला राज्यातील सर्वाधिक जलदगतीने चाललेल्या खटल्यांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.
कांबळेने न्यायालयात स्वतःच्या बचावासाठी मांडलेली कहाणी तथ्यहीन असल्याचे विशेष सरकारी वकिलांनी पुराव्यांसह स्पष्ट केले. वैद्यकीय अहवाल आणि डीएनए प्रोफाइलिंगच्या वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध केला. घटनेनंतर आरोपीच्या वर्तनातील संशयास्पद बाबी आणि त्याला यापूर्वीच्या खटल्यांमुळे असलेल्या कायद्याच्या ज्ञानाचा वापर करून त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न कसा केला, यावरही वकिलांनी प्रकाश टाकला.