

पणजी : पुढारी वृत्तसेवा
एखादा शिक्षक विद्यार्थ्यांच्या स्मरणात का राहतो? त्यांनी वर्गात शिकवलेल्या धड्यांमुळे की, त्यांनी दिलेली मूल्ये आणि छोट्या-छोट्या गोष्टी आयुष्यभर सोबत राहतात म्हणून ? याच संवेदनशील प्रश्नांचा वेध घेणारा आणि सरफराज दिग्दर्शित कबीर सर का आखरी लेसन हा चित्रपट ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'फीचर फिल्म स्पर्धा' विभागासाठी निवडला गेला आहे.
आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्मार्ट क्लासरूममुळे शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. अशा परिस्थितीत हा चित्रपट आपल्याला शिक्षणाच्या मूळ गाभ्याकडे, म्हणजेच शिक्षक आणि विद्यार्थ्यामधील जिव्हाळ्याच्या नात्याकडे घेऊन जातो. यंदाच्या इफ्फीची संकल्पना 'सीमापार कथा' अशी असून, नालंदाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आधारित ही कथा भौगोलिक सीमा ओलांडून प्रत्येकाला आपलीशी वाटणारी आहे.
दिग्दर्शक सरफराज यांचा जन्म जगातील प्राचीन शिक्षण केंद्रांपैकी एक असलेल्या बिहारमधील नालंदा येथे झाला आहे. त्यामुळे शिक्षण आणि गुरु-शिष्य परंपरेवर आधारित ही कथा त्यांच्या मनाच्या अत्यंत जवळची आहे. सध्या गोवा आणि मॉस्को येथे वास्तव्यास असलेल्या सरफराज यांना गोव्यातील प्रेक्षकांसमोर हा चित्रपट सादर करताना विशेष आनंद होत आहे.
'भेजा फ्राय' आणि 'रब ने बना दी जोडी' यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते विनय पाठक या चित्रपटात 'कबीर सर' ही मुख्य भूमिका साकारत आहेत. वेगाने बदलणाऱ्या शिक्षण व्यवस्थेत स्वतःचे स्थान शोधणाऱ्या एका जुन्या विचारांच्या शिक्षकाचा संघर्ष आणि नवीन पिढीतील विद्यार्थ्यांशी जुळवून घेतानाची त्यांची भावनिक बाजू विनय पाठक यांनी मांडली आहे.
शाहबाज आलम आणि शील कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, छायाचित्रण आणि प्रॉडक्शन डिझाइनची जबाबदारी असीम बजाज यांनी सांभाळली आहे. संकलन असीम सिन्हा यांचे असून ध्वनी आरेखन शहाब आलम यांचे आहे. चित्रपटाच्या संगीताला आंतरराष्ट्रीय साज लाभला आहे. पावेल चेर्निख यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली रशियातील सिम्फनी ऑर्केस्ट्रासोबत या चित्रपटाचे पार्श्वसंगीत ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. चित्रपटात 'रहनुमा' (गायिकाः दिपाली सहाय), 'ब्बी यसीर' (गायकः सफू) आणि 'बांध ले बस्ता' (गायक: संजीव) ही तीन अर्थपूर्ण गाणी आहेत.
दिग्दर्शक सरफराज म्हणाले, "शिक्षण म्हणजे केवळ गुण, तंत्रज्ञान किंवा स्मार्ट क्लासरूम नव्हे; तर आपण जोडलेली नाती आणि शिकलेली मूल्ये आहेत. प्रत्येक पिढीचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, पण शिक्षकांच्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांची स्वप्ने यांच्यात कुठेतरी एक सुंदर मानवी नाते दडलेले असते. नालंदामध्ये जन्म झाल्यामुळे हा विषय माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे आणि आज मी ज्या गोव्यात राहतो, तिथल्या इफ्फी महोत्सवात ही कथा सादर करणे हा माझ्यासाठी अत्यंत खास अनुभव आहे.
रसिकांसाठी अनोखी पर्वणी
पुस्तकातील धड्यांपेक्षा आयुष्यात भेटलेली माणसे आणि त्यांनी दिलेला विश्वास आपल्याला घडवतो, हा संदेश देणारा हा चित्रपट रसिकांसाठी एक अनोखी पर्वणी ठरेल. इफ्फीमधील प्रदर्शन २६ रोजी रात्री ८ वा. आयनॉक्स पणजी-ऑडी २, दि. २७ रोजी सायं. ७:३० वा. आयनॉक्स-पर्वरी येथे होणार आहे.