सासष्टी : पुढारी वृत्तसेवा
आगोंद-काणकोण येथील पत्नीच्या खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला संशयित अल्फ्रेड परेरा याची दक्षिण गोवा जिल्हा प्रधान सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. २०२१ मध्ये काणकोण, आगोंदा येथे पत्नी सोनिया माँटेरो ई परेरा हिच्यावर गोळी झाडून खून केल्याचा त्याच्यावर आरोप होता.
खून तसेच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या आरोपांतून न्यायाधीश शर्मिला पाटील यांच्या न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. गेल्या पाच वर्षांपूर्वी १६ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ८.४५ वाजता कराशिरमोल, आगोंदा येथील घर क्रमांक ५६६ येथे संशयिताने पत्नी सोनिया (वय ३३) हिच्यावर बंदुकीतून गोळी झाडल्याचा आरोप होता. गोळी पोटाला लागल्याने तिला काणकोणच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
मृत महिलेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, संशयित आणि त्याच्या पत्नीमध्ये पाच वर्षांपासून वाद सुरू होते. पत्नीला तिच्या कामाच्या ठिकाणी मारहाण व शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून खून झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
तपासादरम्यान घटनास्थळ पंचनामा करण्यात आला होता, तर आरोपीच्या कथित निशानदेहीवरून बंदूक जप्त केल्याचा दावा सरकारी पक्षाने केला होता. न्यायालयाने संशयिताला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३ व २५ अंतर्गत आरोपांतून निर्दोष मुक्त केले आहे.
निकालानंतर कलम ४३७-अ अन्वये आरोपीला १० हजार रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि त्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याचा आदेश देण्यात आला. न्यायालयाने जप्त वस्तूंबाबतही विविध आदेश देत काही वस्तू मालकांना परत करण्याचे, तर बंदुकीची विल्हेवाट जिल्हाधिकारी यांच्यामार्फत लावण्याचे निर्देश दिले आहेत.