

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्यटनासह गोवा जागतिक व्यवसाय आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी सज्ज झाला आहे. 'एनआयसीसीआय कनेक्ट गोवा २०२६'मध्ये गोव्यातील विस्तारणारी आयटी परिसंस्था, स्टार्टअप संस्कृती आणि तंत्रज्ञान व पर्यटन क्षेत्रातील उदयोन्मुख संधींवर प्रकाश पडला आहे, असे प्रतिपादन पर्यटन व माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी केले.
पणजी येथे शुक्रवारी आयोजित 'एनआयसीसीआय कनेक्ट गोवा २०२६' या कार्यक्रमात खंवटे यांनी सहभागी होत नॉर्वेजियन व्यावसायिक शिष्टमंडळाचे गोव्यात स्वागत केले. यावेळी त्यांनी नॉर्वेजियन कंपन्यांना गोव्यात गुंतवणूक, तांत्रिक भागीदारी आणि व्यावसायिक संधी शोधण्याचे आवाहन खंवटे यांनी केले.
मंत्री खंवटे म्हणाले की, गोव्याच्या बदलत्या आर्थिक परिदृश्यावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, गोव्यात व्यवसायवृद्धी, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि आंतरराष्ट्रीय संधींसोबतच उच्च जीवनशैली अनुभवण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध आहे, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात नॉर्वेजियन व्यावसायिक समुदायाचे प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, सरकारी अधिकारी, व्यापारी संघटना आणि अन्य संबंधित घटक सहभागी झाले होते. भारत-नॉर्वे व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
नॉर्वेजियन शिष्टमंडळाच्या सलग दुसऱ्या गोवा भेटीचे स्वागत करताना मंत्र्यांनी माहिती तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, सागरी अभियांत्रिकी, स्वच्छ ऊर्जा, सॉफ्टवेअर विकास, तांत्रिक सेवा आणि पर्यटन या क्षेत्रांतील सहकार्याच्या वाढत्या संधी अधोरेखित केल्या. गेल्या काही वर्षांत केवळ पर्यटनस्थळ म्हणून असलेली गोव्याची ओळख विस्तारून सक्षम आयटी परिसंस्था विकसित केली गेली आहे.
दीर्घकालीन सहकार्य प्रस्थापित करा : खंवटे
गोवा आता नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उद्योजकतेचे आश्वासक केंद्र म्हणून उदयास येत आहे. नॉर्वेजियन कंपन्यांनी गोव्याकडे एक धोरणात्मक व्यावसायिक भागीदार म्हणून पाहावे, स्थानिक पुरवठादारांचा शोध घ्यावा, स्वतःची व्यावसायिक टीम उभारावी, उत्पादने विकसित करावीत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी दीर्घकालीन सहकार्य प्रस्थापित करावे, असे आवाहन मंत्री रोहन खंवटे यांनी केले.