

संतोषा परब
ग्रामीण भागातील रंगभूमी म्हणजे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर अनेक पिढ्यांनी जपलेल्या कलेचा समृद्ध वारसा आहे. या रंगभूमीवर कला सिद्ध करताना कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः स्त्री कलाकारांसाठी हा प्रवास अधिक आव्हानात्मक ठरतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरी-व्यवसाय, प्रवास, तालीमीच्या वेळा आणि सामाजिक बंधने यांचा समतोल साधत त्यांना रंगमंचावर आपले स्थान निर्माण करावे लागते. अशाच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रंगदेवतेची निष्ठेने सेवा करणाऱ्या ग्रामीण रंगभूमीवरील कलाकारांपैकी एक नाव म्हणजे संतोषा परब.
संतोषा परब यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा शिक्षकी पेशा. एकीकडे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे पवित्र कार्य करत असताना दुसरीकडे त्या रंगमंचाच्या माध्यमातून समाजाला कलेचा आनंद देतात. शिक्षिका म्हणून विद्यादान आणि कलाकार म्हणून कलादान, अशा दुहेरी भूमिकेतून त्यांचा प्रवास सुरू आहे.
अडचणींवर मात करून रंगमंचावर उभे राहणे, अभिनयातून पात्राला जिवंत करणे, प्रेक्षकांच्या टाळ्यांना आशीर्वाद मानणे आणि पुढच्या पिढीकडे कलेचा वारसा सोपवणे हीच संतोषा परब यांची खरी 'रंगयात्रा' आहे. रंगमंचावर एखादी भूमिका साकारताना केवळ संवाद पाठ करून चालत नाही.
त्या व्यक्तिरेखेचे अंतरंग समजून घ्यावे लागते, कथेचा गाभा जाणून घ्यावा लागतो आणि आपल्या अभिनयातून त्या पात्राला जिवंत करावे लागते. याच ध्यासातून नाट्य आणि संगीत या दोन्ही क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नाव म्हणजे संतोषा भालचंद्र परब.
२९ मार्च २००० रोजी जन्मलेल्या संतोषा परब यांनी संगीत विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. बालपणापासूनच त्यांना कला आणि संगीताची आवड होती. शालेय जीवनात विविध स्नेहसंमेलनांमधून त्यांनी आपल्यातील कलागुणांना वाव दिला. पुढे याच आवडीने त्यांना व्यावसायिक आणि स्पर्धात्मक रंगभूमीकडे आकर्षित केले.
संतोषा यांच्या कलाजीवनाची पायाभरणी घरातूनच झाली. त्यांचे वडील भालचंद्र परब यांच्याकडून त्यांना कलेचा वारसा आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. घरातील कलात्मक वातावरणामुळे लहानपणापासून अभिनय, संगीत आणि रंगभूमीशी त्यांची जवळीक निर्माण झाली.
'योगी पावन मनाचा' या नाटकातून त्यांनी नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच टप्प्यात अभिनयातील आत्मविश्वास, संवादाफेक आणि भूमिका समजून घेण्याची वृत्ती यामुळे त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी 'पंत दामाजी', 'धनुर्भंग', 'धनुर्वेद', 'हे बंध रेशमाचे', 'झाला कुरांज पांडुरंग', 'गरुडझेप', 'आंधळ्याची काठी', 'चंद्रहास', 'नामा म्हणे', 'पाणीग्रहण', 'गाजले सह्याद्रीचे कडे', 'जय जय गौरीशंकर', 'शिव वरदान', 'अवघी विठाई माझी' अशा विविध नाट्यप्रयोगात भूमिका साकारल्या.
तसेच राजीव गांधी कला मंदिराच्या महिला नाट्यस्पर्धेमध्येही त्यांनी सहभाग घेत आपली अभिनयकला सादर केली आहे. संतोषा यांनी केवळ गोव्यातुरती आपली कला मर्यादित न ठेवता महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध ठिकाणी नाट्यप्रयोग केले. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.
'योगी पावन मनाचा' या नाटकातली त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली. काही प्रयोगांमध्ये रसिकांनी त्यांच्या अभिनयाचे कौतुक करत वैयक्तिकरीत्या रोख बक्षिसे देऊन त्यांना प्रोत्साहन दिले. मात्र रंगभूमीकडे त्यांनी कधीही केवळ मानधनाच्या अपेक्षेने पाहिले नाही. रंगदेवतेची सेवा आणि प्रेक्षकांचे समाधान हेच कलाकाराचे खरे मानधन, अशी त्यांची भूमिका आहे.
संवाद केवळ बोलायचा नसतो, तर तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा असतो, या जाणिवेतून त्यांनी वेळोवेळी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. विविध कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन अभिनयातील बारकावे आत्मसात केले. सिद्धेश परब, कमलाकर परब आणि साई रामनाथ नाईक यांना त्या आजही गुरुस्थानी मानतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अभिनयाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक झाल्याचे संतोषा सांगतात.
रंगभूमीबरोबरच संगीत हे संतोषा यांच्या जीवनातील आणखी एक महत्त्वाचे अंग आहे. त्यांनी गोव्यात संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर सोलापूर येथे एम.ए. म्युझिकचा अभ्यासक्रम पूर्ण केला. संगीताचे अधिक सखोल मार्गदर्शन त्यांना शिवानंद दामोलकर यांच्याकडून लाभले.
अभिनय आणि संगीत या दोन्ही कलांचा एकमेकांना फायदा होत असल्याचे त्यांच्या कलाप्रवासातून दिसून येते.
संगीताच्या अभ्यासामुळे आवाजावर नियंत्रण, लय, भाव आणि शब्दोच्चार यांची जाण अधिक विकसित झाली आणि त्याचा उपयोग रंगभूमीवरील अभिनयातही होत असल्याचे त्या सांगतात. कलेबद्दलची निष्ठा आणि शिक्षणाविषयीची जिद्द अधोरेखित करणारा एक प्रसंग संतोषा यांच्या कायम स्मरणात आहे. एकदा त्यांच्या नाटकाचा महत्त्वाचा प्रयोग होता आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोलापूर येथे संगीताची परीक्षा होती.
नाटकाचा प्रयोग सोडणे त्यांना मान्य नव्हते आणि परीक्षा चुकवणेही शक्य नव्हते. त्यांनी नाट्यप्रयोग पूर्ण केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोलापूर गाठून परीक्षा दिली. विशेष म्हणजे त्या परीक्षेत त्यांनी यशही संपादन केले. हे यश म्हणजे रंगदेवतेचीच कृपा, असे त्या नम्रपणे सांगतात. अनेक भूमिका साकारल्या असल्या तरी 'मुक्ताई' ही व्यक्तिरेखा संतोषा यांच्या विशेष आवडीची आहे.
भूमिका छोटी असो किंवा मोठी, नाटकाचा संपूर्ण प्रयोग दर्जादार झाला पाहिजे, ही त्यांची धारणा आहे. त्यामुळे स्वतःची भूमिका उठून दिसण्यापेक्षा संपूर्ण नाट्यप्रयोग यशस्वी व्हावा यावर त्या भर देतात. आजच्या काळात ग्रामीण भागातील कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः महिला कलाकारांसाठी शिक्षण, कुटुंब, प्रवास, तालमी आणि नाट्यप्रयोग यांचा समतोल राखणे आव्हानात्मक ठरते.
मात्र या अडचणींकडे न पाहता संतोषा परब यांनी आपल्या कलेशी निष्ठा कायम ठेवली आहे. त्यांच्या मते कलाकाराने सातत्याने शिकत राहणे आवश्यक आहे. टाळ्यांचा कडकडाट असो, रोख बक्षीस असो किंवा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील समाधान या सगळ्यांपेक्षा रंगदेवतेची मनापासून सेवा करता येणे हेच कलाकाराचे सर्वांत मोठे यश आहे, ही भावना जपत संतोषा परब रंगभूमी आणि संगीताच्या क्षेत्रात आपली वाटचाल पुढे नेत आहेत.
रंगभूमीवरील अभिनयाबरोबरच संगीताची साधनाही तितक्याच निष्ठेने करणाऱ्या संतोषा परब यांनी स्वतंत्र गायनाच्या कार्यक्रमांतूनही आपल्या कलेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोरजी, मांद्रे, म्हापसा, पणजी, पालये यांसह विविध ठिकाणी त्यांनी स्वतंत्र गायनाचे कार्यक्रम सादर केले आहेत. अभिनय आणि गायन ही कलाजीवनाची दोन महत्त्वाची अंगे असून, अभिनयाइतकेच संगीताला आपण प्राधान्य देत असल्याचे त्या सांगतात.
संगीत क्षेत्रातील दिग्गुरू केळकर हे संतोषा यांचे आवडते कलाकार आहेत. तर नाट्यक्षेत्रात अभिनेत्री शारदा शेडकर यांच्याकडून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. शारदा शेडकर यांच्यासोबत सुमारे दहा नाट्यप्रयोग करण्याची संधी मिळाल्याचे संतोषा अभिमानाने सांगतात. अनुभवी कलाकारांसोबत रंगमंचावर काम करताना अभिनयातील अनेक बारकावे शिकता आले आणि प्रत्येक प्रयोगातून नवे काही आत्मसात करता आले, असे त्या नमूद करतात.
आपल्या नाट्यप्रवासामध्ये वडिलांचे योगदान मोठे असल्याचे संतोषा आवर्जून सांगतात. पप्पांकडूनच मला नाटकाची प्रेरणा आणि कलेचा वारसा मिळाला, असे त्या सांगतात.
रंगभूमीकडे केवळ छंद म्हणून पाहण्याचा काळ आता बदलला हवा, असे संतोषा यांचे मत आहे. नाट्यक्षेत्रातही उत्तम करिअर घडवण्याच्या संधी आहेत; मात्र त्यासाठी कलाकाराने सतत नवनवीन प्रयोग करणे, प्रशिक्षण घेणे आणि स्वतःच्या कलेमध्ये सुधारणा करत राहणे आवश्यक आहे, असे त्या सांगतात. विशेषतः युवक-युवतींनी रंगभूमीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले.
ग्रामीण भागात महिला कलाकारांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातबद्दल मात्र संतोषा परब स्पष्टपणे आपली खंत व्यक्त करतात. काळ बदलला असला तरी काही ठिकाणी 'नटी' या शब्दाकडे अजूनही कमीपणाने किंवा वेगळ्या नजरेने पाहिले जाते, ही बाब त्यांना खटकते.
त्या म्हणतात, आजही एखादी महिला कलाकार गावात आली की काही जण 'नटी आली रे, नटी आली रे...' अशा प्रकारे टिप्पणी करतात. कलाकाराकडे पाहण्याची ही मानसिकता आता बदलली पाहिजे. 'नटी' म्हणजे रंगभूमीवर आपली कला सादर करणारी अभिनेत्री आहे. तिच्या कलेचा आणि मेहनतीचा आदर व्हायला हवा. असे त्यांचे मत आहे.