चावडी : पुढारी वृत्तसेवा
भारत देश जगातील तिसरी महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. २०१४ पासून देशाची भरभराट होत असून जनतेला साधनसुविधा मिळण्याबरोबरच विकासाची गंगा वाहू लागली आहे. ट्रम्प यांनी भारतावर जे टेरिफ लादले त्याची पर्वा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले कार्य करीत राहिले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारतीयांना जगात आदराने पाहिले जात आहे, असे प्रतिपादन कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांनी केले.
काणकोण उपजिल्हाधिकारी कार्यालयाने गायतोंडे मैदानावर आयोजित केलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळयात ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष लक्ष्मण पागी, उपजिल्हाधिकारी प्रतापराव नाईक गावकर, मामलेदार गजेश शिरोडकर, पो. उपअधीक्षक निलेश राणे, पो. निरीक्षक प्रविण गांवस, वाहतूक निरीक्षक गौतम साळुंके, नगरसेविका नीतू देसाई, सारा देसाई, अमिता पागी, नगरसेवक नार्सिस्को फर्नांडिस, रमाकांत नाईक गावकर, सायमन रेबेलो, स्वतंत्र सैनिकाच्या धर्मपत्नी, विविध कार्यालयाचे प्रमुख व इतर उपस्थित होते. ते म्हणाले, भारत देशावर अनेकांनी आक्रमण केले.
आपली संपत्ती लुटण्याबरोबरच आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या स्वातंत्र्यसैनिकाच्या बलिदानातून आम्हाला आज चांगले दिवस पाहायला मिळत आहेत. आपल्या स्वातंत्र्यसैनिकाच्या बलिदानाची आठवण आम्ही ठेवायला हवी. काणकोण तालुका आज शंभर टक्के भूमिगत वीज वाहिनी घालून स्वयंपूर्ण झाला असून केरी, नडके येथे सुद्धा वीजपुरवठा पोहोचविण्यास वीज खाते यशस्वी झाल्याचे मंत्री तवडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, श्रमधाम संकल्पनेअंतर्गत काणकोणमधील एकही व्यक्ती निवाऱ्याशिवाय राहणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.
तिसऱ्या कुशावती जिल्ह्यामुळे काणकोणचा परिपूर्ण विकास होईल. काणकोणात ३७ टक्के आदिवासी समाज असून या समाजाच्या उत्कर्षाकरीता मिळणारा निधी हा काणकोणचा विकास घडवून आणण्यास उपयुक्त ठरणार आहे. तिसऱ्या जिल्ह्यासंबधी विरोधक विरोध करण्याचे काम करण्याबरोबरच नागरिकाना भडकावण्याचे काम करीत आहेत.
यावेळी काणकोण वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक गौतम साळुंके यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतिपदक जाहीर झाल्याने त्याचा मंत्री तवडकराहस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक अजित वेळीप यानी मंत्री तबडकर याना मानवंदना दिली. विविध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष पै यांनी केले.