

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आत्मनिर्भर भारत २०४७ आणि विकसित गोवा २०३७ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे आणि सर्वसमावेशक कार्य करण्याची गरज आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना आणि विकासकामांमुळे गोव्यातील जनतेचा हॅप्पीनेस इंडेक्स (आनंद निर्देशांक) वाढत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी केले.
राज्यात सोमवारी सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय कार्यक्रम गोवा विद्यापीठाच्या मैदानावर पार पडला. राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी संचलनाची (परेड) पाहणी करून मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
राज्यपाल म्हणाले की, केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना आणि पायाभूत सुविधांमुळे राज्याची वेगाने प्रगती सुरू आहे. कुशावती जिल्ह्याच्या स्थापनेमुळे प्रशासकीय सुधारणा होण्याबरोबरच विकासालाही गती मिळणार आहे. पर्यटनात आघाडीवर असलेले गोवा राज्य आता नवनिर्मिती आणि सेवा क्षेत्रातही देशातील अग्रणी राज्य बनले आहे.
स्वयंपूर्ण गोवा मोहीम सुरू असतानाच, सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकारने माझे घर योजना सुरू केली आहे. रस्ते, पूल, पाणीपुरवठा, मलनिस्सारण प्रकल्प आणि शैक्षणिक संस्थांच्या उभारणीमुळे पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक वाढत आहे. या समृद्धीमुळे राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी जनतेने सहकार्य करावे आणि आपला मोलाचा हातभार लावावा, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.
गोव्यातील प्रशासकीय कार्यक्षमता विकेंद्रीकरण आणि लोकाभिमुख कारभाराच्या दिशेने कुशावती जिल्ह्याची निर्मिती हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे प्रशासकीय वाढण्यासोबतच सरकारी सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे राज्यपालांनी आपल्या भाषणात नमूद केले.
सत्तेचे विकेंद्रीकरण काळाची गरज...
ते म्हणाले, नवीन जिल्ह्याच्या स्थापनेमुळे प्रशासन सामान्यांच्या अधिक जवळ येईल, यामुळे स्थानिक पातळीवर जलद निर्णय घेणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय राखणे सोपे होणार आहे. समतोल प्रादेशिक विकास आणि सर्वसमावेशक वाढीसाठी सत्तेचे विकेंद्रीकरण होणे काळाची गरज आहे.
कुशावती जिल्ह्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रशासकीय आव्हाने संपुष्टात येतील आणि स्थानिक प्रशासन अधिक बळकट होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांचा पदके प्रदान करून सन्मान करण्यात आला.