
पणजी; प्रभाकर धुरी : 'फाईट लाइक अ गर्ल' (Fight Like a Girl) हा मॅथ्यू ल्युटवायलर दिग्दर्शित चित्रपट तरुण काँगोली महिलेची कथा सांगतो. या तरुणीला अवैध खनिज खाणीतून स्वतःची सुटका केल्यानंतर बॉक्सिंग रिंगमध्ये नवे जीवन मिळते. हा चित्रपट गोवा येथे आयोजित ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'सिनेमा ऑफ द वर्ल्ड' श्रेणी अंतर्गत प्रदर्शित करण्यात आला.
संबंधित बातम्या :
पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी आणि प्रतिनिधींशी संवाद साधताना मॅथ्यू ल्युटवायलर म्हणाले की, "हा चित्रपट सत्य घटनांनी प्रेरित आहे. हा चित्रपट पूर्व काँगोमधील महिला बॉक्सिंग क्लबच्या कथेवर आधारित आहे, या क्लबची सुरुवात एका सैनिकाने केली होती. लैंगिक हिंसाचार आणि विश्वासघाताला बळी पडलेल्या तरुणींनी त्याच्याशी संपर्क साधला. बॉक्सिंगच्या माध्यमातून या तरुणींना त्यांचा आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी तो त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होता. एके दिवशी एक तरुणी आपल्या वडिलांचा खून करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याच्या उद्देशाने बॉक्सिंग क्लबमध्ये आली. नंतर तिच्या सूडाचे रूपांतर होत, ती बॉक्सिंगला एक खेळ म्हणून स्वीकारते. या महिलेच्या जीवन प्रवासामुळेच मला त्यातून चित्रपट बनवण्याची प्रेरणा मिळाली. या चित्रपटाचा एक अनोखा पैलू म्हणजे ८० टक्के कलाकार हे मूळतः कलाकार नाहीत. चित्रपटात दाखवलेले क्लबचे बहुतेक बॉक्सर हे कॉंगोच्या अंतर्गत भागांतील खरे बॉक्सर आहेत," असे त्यांनी सांगितले. (Fight Like a Girl)
नायिकेच्या भूमिकेसाठी केलेल्या तयारीबद्दल सांगताना मुख्य अभिनेत्री अमा कमता म्हणाली की, "वास्तविक जीवनात कधीही लढा न देणारी व्यक्ती म्हणून बॉक्सरच्या भूमिकेत उतरणे हे एक मोठे आव्हान होते. तयारीचा एक भाग म्हणून, मी आठवड्यातून सहा दिवस सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास प्रशिक्षण घ्यायचे. चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा केवळ बॉक्सरची नाही. अत्याचाराविरुद्ध लढा, व्यवस्थेविरुद्ध लढा आणि जीवनासाठी लढा देण्याची प्रेरणा यामध्ये आहे, असे तिने सांगितले.
हेही वाचा :