पणजी : ओड’ लघुपटाला सर्वोत्तम पटाचा पुरस्कार | पुढारी

पणजी : ओड' लघुपटाला सर्वोत्तम पटाचा पुरस्कार

पणजीः दीपक जाधव गोव्यासह देशाच्या समुद्र किनारी परिरांमधील दिवसेंदिवस आक्रसत चाललेल्या समुद्रकिनाऱ्याबाबत विचार करायला लावणाऱ्या आणि मनाची पकड घेणाऱ्या ‘ओड’ या लघुपटाने, गोवा येथे सुरू असलेल्‍या 54 व्या इफ्फीमध्ये ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ उपक्रमात सर्वोत्तम पटाचा पुरस्कार पटकावला आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सह सचिव (चित्रपट) आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार यांनी चित्रपट निर्मितीमध्ये खऱ्या आशयाची ओळख करून देण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. यामुळे भारताला जागतिक स्तरावर लौकिक वाढेल, असे त्यांनी सांगितले. उत्तम आशय असलेले चित्रपट करण्यासाठी प्रेरित असलेल्या देशभरातील तरुण सर्जनशील व्यक्तींसाठी ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’, हे उत्तम व्यासपीठ आहे, असे ते म्हणाले.

’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ मधील परीक्षक सदस्य दिग्दर्शक शूजित सरकार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ‘ द मिशन लाईफ’ या संकल्पनेवर 48 तासात लघुपट तयार करणे, आत्मपरीक्षण, आशा, निषेध अशा सर्व भावना संमीलित करणे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धेतील सर्व लघुपटांच्या संघांचे त्यांनी अभिनंदन केले. सर्व चित्रपट खरोखरच समर्पक, विचार करायला लावणारे आणि पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन या अत्यंत महत्त्वाच्या विषयाशी संबंधित होते, असे शूजित सरकार यांनी सांगितले. ” खरे तर, तुम्ही सर्वच जण विजेते आहात.”’ असे कौतुक त्यांनी केले.

परीक्षक मंडळातील सदस्य आणि शॉर्ट्स टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्टर पिल्चर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तरुण सर्जनशील मनांना त्यांची प्रतिभा इतरांसमोर आणण्यासाठी ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ सारखे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची संकल्पना कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

फिल्म चॅलेंजचा एक भाग म्हणून, 75 ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ सहभागींना पाच संघांमध्ये विभागण्यात आले होते. त्यांनी 48 तासात ‘मिशन लाइफ’ या संकल्पनेवर लघुपट तयार केले.

शॉर्ट्स इंटरनॅशनलच्या सहकार्याने एनएफडीसीने या स्पर्धेची संकल्पना राबवली. स्पर्धेतील सहभागींनी सिनेक्षेत्रातील जागतिक अग्रणींनी आखलेल्या कार्यशाळा आणि मास्टरक्लास सत्रांनाही हजेरी लावली.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग सिंग ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम उदयाला आला असून, त्याचा उद्देश चित्रपट निर्मितीच्या विविध व्यवसायातील तरुण सर्जनशील प्रतिभांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना अधिकाधिक ज्ञानसमृद्ध करणे, हा आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उत्सवाचा एक भाग म्हणून देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचे औचित्य साधून 2021 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.

‘ काय आहे ओड’ मध्ये?

मच्छीमार समुदायातील मार्सलीन, आपली बोट ठेवण्यासाठी पार्किंगची जागा शोधण्याच्या प्रयत्नात आपली बोट शहराच्या मध्यभागी घेऊन जातो. समुद्रकिनारा चोरीला गेला आहे आणि त्याच्याकडे पार्क करण्यासाठी जागा शिल्लक नाही, अशी तक्रार तो करतो.
समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ आणि समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाल्यामुळे गोव्याचा आक्रसता समुद्रकिनारा, या समस्येवर हा लघुपट आहे.

Back to top button