

पणजी : पुढारी वृत्तसेवा
रस्त्यावर धावणाऱ्या सर्व वाहनांना हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. ही मुदत बुधवारी संपत आहे. त्यामुळे एचएसआरपी नंबरप्लेट न बसविणाऱ्याला नववर्षापासून १ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. आतापर्यंत परिवहन विभागाने त्यासाठी चारवेळा मुदत दिली आहे. असे असले, तरी किती जणांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवली आणि किती जणांनी बसवली नाही याची माहिती पणजी येथील परिवहन कार्यालयाकडून प्राप्त झाली नाही. उलट एका परिवहन अधिकाऱ्याने ३१ डिसेंबर ही डेडलाईन असल्याची माहिती नसल्याचे सांगून त्याबाबतचे परिपत्रक आपल्याकडे आहे काय, असा उलट प्रश्नच केला. यावरून संबंधित अधिकारी व परिवहन कार्यालय याबाबत अनभिज्ञ असण्याची शक्यता आहे.
तर दुसऱ्यावेळी होईल तिप्पट दंड
मूळ नंबरप्लेट बदलून फॅन्सी नंबरप्लेट बसविल्यास पहिल्यांदा त्या वाहनास ५०० रुपयांचा दंड केला जातो. त्यानंतर दुसऱ्यावेळी तिप्पट म्हणजेच १,५०० रुपयांचा दंड होतो. दुसरीकडे, नंबरप्लेटमध्ये छेडछाड करून त्याचे रूपांतर नावात केलेल्या वाहनास पहिल्यांदा एक हजार रुपये आणि दुसऱ्यावेळी दोन हजार रुपयांचा दंड केला जातो. वारंवार मुदत देऊनही एचएसआरपी न बसविल्यास आगामी काळात अशा वाहनांना एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
मुदतवाढ शक्य...
एचएसआरपी बसवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. अनेक वाहनांना अद्याप या प्लेट बसवण्यात न आल्याने मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. ती मिळाली नाही, तर एचएसआरपी न बसविणाऱ्या वाहनांना आगामी काळात १,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.