

वास्को : नवीन मासळी मार्केटमध्ये सोमवारपासून (दि. 29)मासेविक्री करावी असा आदेश मुख्याधिकारी सिध्दीविनायक नाईक यांनी काढला असतानाही मासे विक्रेत्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे येथे विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याप्रकरणी नगराध्यक्ष गिरिष बोरकर यांनी आम्ही आणखी दोन दिवस वाट पाहणार आहोत, त्या दरम्यान मासेविक्रेत्यांनी नवीन मार्केटात स्थलांतर केले तर ठीक आहे, नाहीतर आम्हाला पुढील कारवाई करावी लागेल असे सांगितले.
मुरगाव पालिकेने वास्कोवासियांसाठी नवीन मासळी मार्केट बांधले आहे.या मार्केटाचे उद्घाटन कधी होणार आहे? सदर मार्केट पांढरा हत्ती तर होणार नाही ना? असे विविध प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत होते. सदर मार्केट जीसुडाने सष्टेंबर महिन्यात मुरगाव पालिकेकडे हस्तांतरित केले होते. त्यानंतर नवीन मार्केटात मासळी विक्रेत्यांनी स्थलांतर करण्याची गरज होती. आमच्या काही मागण्या पूर्ण करण्यात आल्या नसल्याचा दावा मासळी विक्रेत्यांनी केला होता. त्या मागण्या पूर्ण झाल्यावरच आम्ही तेथे स्थलांतर करू असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात आल्या. सदर मार्केटाचे उद्घाटन कधी होणार याकडे वास्कोवासियांचे लक्ष लागले होते.दोन वेळा उद्घाटनाची तारीख घोषित करूनही उद्घाटन न झाल्याने मार्केट चर्चेत आले होते.
त्यानंतर मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिध्दीविनायक नाईक यांनी सदर मार्केटासंबंधी आदेश काढला. त्यामध्ये मार्केटाची देखभाल कोण करणार, तेथील जागावाटप लॉटरी पध्दतीने केले जाईल, तेथे मासे विक्रेत्यांसह पूर्वीच्या भाजी, फळे, नारळ विक्रेत्यांनाही सामावून घेतले जाईल, मार्केट आराखडामध्ये गरजेनुसार बदल करण्यात येईल वगैरे गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या होत्या. सध्या ज्या जागेवर मासे विक्री करण्यात येत आहे, ती जागा 28 डिसेंबरपर्यंत खाली करून मासळी विक्रेत्यांनी आपले सामान नवीन मार्केटात न्यावे, असे आदेशात म्हटले होते.