

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सर्वोच्च न्यायालयाने दुचाकी चालकासोबत मागे प्रवाशालाही हेल्मेट घालण्याचे आदेश दिले आहेत. वाहतूक खात्याच्या नियमानुसार दुचाकीवरील दोघांनीही हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. वाढलेले रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारने दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती करावी, अशी मागणी आमदार अॅड. कार्लस फेरेरा यांनी केली.
विधानसभेत बुधवारी प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार फेरेरा यांनी राज्यातील वाढत्या आत्महत्या, रस्ता अपघात, ड्रग्जचा व्यवहार व खून अशा विषयांवर प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले की, बिट्स पिलानी येथे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यावर नियंत्रणासाठी समुपदेशक नेमण्याची गरज आहे.
रस्ता अपघातात मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात दुचाकीस्वारांची संख्या जास्त आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती करा, अशी मागणी अॅड. फेरेरा यांनी केली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यात घडलेले गुन्हे, चोऱ्या, बलात्कार व ड्रग्ज विषयावर सरकारवर टीका केली.
गोवा हे गुन्हेगारी राज्य होत असल्याचे टीका केले. गोव्यात ड्रग्जचा व्यवहार ३५ टक्के वाढल्याचे सांगून गोव्यात पावलोपावली एस्कोवार वाढल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शाळा व महाविद्यालयात समुपदेशक नेमले आहेत.
पर्यटक मद्य पिऊन वाहने वेगाने चालवतात. वाहतूक खाते कारवाई करते, तरीही अपघात होतात. असे सांगून दोघांनाही हेल्मेट परिधान करण्याची अधिसूचना यापूर्वीच वाहतूक खात्याने काढल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात गुन्हेगारी तपासाचा दर ८६ टक्के असून तो देशात सगळ्यात जास्त असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. परप्रांतीयांमुळे गुन्हे वाढत असून भाडेकरूंची पोलिस ओळख सक्तीची केली गेली आहे. जे भाडेकरूंची माहिती देत नाहीत, त्यांना दंडही केला जात असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
खून २०२१-२२ : २४, २२- २३:४४, २४-२५ : २७.
बलात्कार २०२१ ७२, २२ः ७५,२३ः ९७, २४ः १०९ व २५ः १०२.
चोऱ्या २०२४: ३१४व २०२५: ३७४