

पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबच्या गेट समोरील रस्ता स्थानिक आणि क्लब व्यावसायिक यांच्यातील कळीचा मुद्दा ठरला आहे. हा रस्ता खूपच अरुंद आहे. याच रस्त्यावर क्लबमध्ये जाणारे पर्यटक आपली वाहने लावायचे. यामुळे तासन्तास मोठी वाहतूक कोंडी व्हायची.
यामुळे स्थानिक ग्रामस्थांचा आणि क्लब व्यावसायिकांमध्ये सतत संघर्षही व्हायचा. याच वादातून स्थानिकांनी पर्यटकांना आत जाऊ न देता रस्त्यावरच रोखून धरत दोन-तीन वेळा क्लबमधील कार्यक्रम बंद पाडले होते. काही ग्रामस्थांनी रस्त्यालगतच्या स्टॉल बांधकामालाही आक्षेप घेतला असल्याचे सांगितले.
अगदी रस्त्याला लागून ते बांधकाम केले असून तो अतिक्रमणाचा भाग असल्याचे स्थानिकांचे म्हणणं आहे. क्लबकडे वाहने पार्किंग करण्याची स्वतःची जागा असायला हवी. पण, ती नसल्याने पर्यटक रस्त्यावरच वाहने लावायचे आणि संघर्षाची ठिणगी पडायची. तूर्त, क्लब आगीच्या भक्ष्यस्थानी पडून २५ जणांचा मृत्यू झाल्याने तो पुन्हा सुरू होईल की नाही, याबाबत संभ्रम आहे.
एका स्थानिक युवकाने सांगितले की, हडफडेमध्ये काही वादग्रस्त क्लब होते. त्यात देहव्यापार व अन्य अवैध धंदे चालायचे. त्याचा त्रास सर्वांना होऊ लागल्याने ते ४ - ५ क्लब आम्ही सर्वांनी मिळून बंद पाडले. या क्लबमध्ये मात्र तसले प्रकार होत नव्हते; मात्र हा क्लब अनधिकृतपणे सुरू होता. केंद्र सरकारमधील एका मंत्र्याच्या मुलाचे या क्लबला आशीर्वाद असल्याचेही तो म्हणाला.