

पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथील नाईट क्लबमधील स्टेजच्या वरील भागाला आग लागण्यापूर्वी काही क्षण आधी त्याच स्टेजवर कझाकिस्तानची बेली डान्सर क्रिस्टीना शेख नृत्य सादर करीत होती. या दुर्घटनेसंदर्भात तिने आपला अनुभव समाज माध्यमांवर शेअर केला. ती म्हणाली, मी नृत्य करत असताना अचानक सगळे बदलले.
दिवे बंद झाले, संगीत थांबले आणि स्टेजवर एक अनोळखी वास येऊ लागला. काही सेकंदांतच, धुराचे दाट ढग स्टेजवर पसरले, ज्यामुळे मला नीट दिसत नव्हते, श्वास घेता क्रिस्टीना शेख येत नव्हता. आग लागल्याचे समजताच लोक जीवाच्या आकांताने बाहेर पळू लागले. स्टाफ मदतीला धावत आला. लोक एकमेकांना हात देत होते; परंतु त्या क्षणी कुणालाही वाटले नव्हते की, एवढ्या झपाट्याने सर्व काही बदलेल.
पहिल्यांदा मला चेंजिंग रूममध्ये जावेसे वाटले. पण, माझ्या क्रू मेंबरने मला तिकडे जाऊ दिले नाही. कदाचित त्याचमुळे माझा जीव वाचला असावा. नाहीतर, मीही धुरात गुदमरून मृत्युमुखी पडले असते. नियमित सादरीकरण करत असताना एका क्षणी जीवन-मरणाचा अनुभव मला पहिल्यांदाच आला; मात्र मी वाचले. याबद्दल मी देवाचे आभार मानले, असेही ती म्हणाली. या घटनेनंतर मात्र ती समाज माध्यमांवर चर्चेत आली आहे.