

मेलबर्न : पुढारी वृत्तसेवा
जगभरातील अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी युनायटेड किंगडम (यूके) येथील न्यायालयाने मूळ गोमंतकीय ट्रेव्हर फर्नांडिस (वय ४१) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मूळचा गोव्याचा रहिवासी असलेला ट्रेव्हर फर्नांडिस, काही वर्षांपूर्वी यूकेमध्ये स्थलांतरित झाला होता. त्यानंतर २०१५ ते २०२० दरम्यान अनेक अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याचे पुढे आले आहे.
त्यात १ ते १६ वर्षांच्या मुलींचा समावेश होता. स्विंडन मधील एका निवासी घरातून तो हे कृत्य करीत होता. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण एजन्सीने अमेरिकेतील अधिकारी आणि क्राऊन प्रॉसिक्यूशन सर्व्हिस यांच्या सहकायनि केलेल्या व्यापक आंतरराष्ट्रीय तपासानंतर ट्रेव्हरचे अमानुष कारनामे उघडकीस आले.
अमेरिकेतील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी एका अल्पवयीन मुलींशी संबंधित संशयापस्द ऑनलाईन हालचाली ओळखल्यानंतर हा तपास सुरू झाला आणि तो यूकेपर्यंत त्यातून अखेरीस स्वरूप पोहोचला. फर्नाडिसच्या गुन्हेगारीचे उघडकीस आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील एका पीडितेने या शोषणाची तक्रार केल्यामुळे तिच्या धाडसामुळे हे एकूण प्रकरण उघडकीस आले.
अनेक अधिकार क्षेत्रांमधील अधिकाऱ्यांनी पीडितांना ओळखण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या व्यापक तपासाचा भाग म्हणून जगभरातील शेकडो व्यक्तींची ओळख पटवण्यात आली आणि त्यांचे संरक्षण करण्यात आले.
आरोपीने गुन्हा कबूल केला
स्विंडन क्राउन न्यायालयात फर्नांडिसने खंडणी, अल्पवयीन मुलांना लैंगिक कृत्यांसाठी प्रवृत्त करणे, आणि अश्लील छायाचित्रे बाळगणे व वितरित करणे यासह इतर सर्व आरोपांमध्ये आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
२०२२ मध्ये १४ वर्षांची शिक्षा
बाल शोषणाशी संबंधित अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरल्यानंतर त्याला २०२२ मध्ये १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तथापि, डिजिटल उपकरणांच्या न्यायवैद्यक विश्लेषणासह केलेल्या पुढील तपासात, गुन्हेगारीचे एक अधिक व्यापक स्वरूप उघड झाले. त्यामुळे यूके, अमेरिका, कॅनडा, आयर्लंड आणि नॉर्वे येथील पीडितांशी संबंधित अतिरिक्त ६७ आरोप दाखल करण्यात आले.