

डिचोली : पुढारी वृत्तसेवा
गोवा सरकार नव्याने स्थापन केलेल्या आयुष विभागाच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण, संशोधनाधारित उपचारपद्धती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रम अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. दरम्यान, राज्यात ३० वर्षांपूर्वी केवळ गोमेकॉ येथे डायलिसिस उपचार केंद्र होते.
मात्र, आता ही सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी इस्पितळांमध्येही उपलब्ध आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. साखळी येथे साई नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये गोवा होमिओपॅथी कौन्सिल आणि श्री कामाक्षीदेवी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री म्हणाले, होमिओपॅथी उपचार पद्धतीत कुठलेही दुष्परिणाम नाहीत. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री सावंत बोलत होते. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टर व तज्ज्ञांचा सत्कार केला.
गोव्यात होमिओपॅथीचा प्रसार करण्यासाठी डॉ. बिपिन सालकर आणि गोवा होमिओपॅथी कौन्सिल यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. सरकार होमिओपॅथीला प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलत आहे. गावागावांत युवकांनी पुढे येऊन स्वतःचे वेलनेस सेंटर सुरू करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
'चेक बाय डॉक्टर्स'ला मोठा प्रतिसाद '
चेक बाय डॉक्टर्स' या उपक्रमाला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ४० वर्षांवरील सुमारे ४० हजार महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ३ ते ४ टक्के महिलांनी पुढील तपासणी तसेच उपचारांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
डायलिसिस केंद्रांची संख्या वाढली
गोव्यात तीन दशकांपूर्वी गोमेकॉ येथे डायलिसिस उपचार केंद्र होते. ही संख्या आता ११६ वर पोहोचली असून, उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळांसह तीन ठिकाणी डायलिसिस उपचार केंद्रे आहेत.
मात्र, आता त्याचा विस्तार प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचला असून, डायलिसिसपासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक तपासणी करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.