

पणजी : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये मगो, भाजप व गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष वगळता काँग्रेस, आरजी व आम आदमी पक्षाचे अध्यक्ष नापास झाले असेच म्हणावे लागेल, कारण त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील जि.पं. मतदारसंघांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना ते यश मिळवून देऊ शकले नाहीत.
भाजपचे अध्यक्ष दामू नाईक व गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई हे दोन्ही नेते फातोर्डा या पालिका क्षेत्रात राहतात. त्यांच्या विधानसभा क्षेत्रांमध्ये जिल्हा पंचायत मतदारसंघ नाहीत. काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर हे कुडचडेमधून २०२२ मध्ये विधानसभेची निवडणूक लढले होते कुडचडेत येणाऱ्या शेल्डे या जि.पं. मतदारसंघातून भाजपचे सिद्धार्थ गावस देसाई हे ६३७० मते घेऊन जिंकले.
काँग्रेस उमेदवार रोसिरियो फर्नांडीस यांना २७१४ मते मिळाली. त्यामुळे अमित पाटकर यांना हा धक्का आहे. रीवण मध्येही भाजपच्या राजश्री गावकर या विजयी झालेल्या आहेत. आपचे अॅड. अमित पालेकर यांनी सांताक्रुज मतदार संघातून २०२२ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या या मतदारसंघात येणाऱ्या चिंबल जि.पं. मतदारसंघात भाजपच्या गौरी कामत या ५७३० मते घेऊन विजयी झाल्या.
आपच्या उमेदवार मारिया आंताव यांना २८४३ मते तर सांताक्रुज जि.पं. मतदार संघातून आरजी पक्षाच्या एस्पेरांका ब्रागांझा या ४५३३ मतांनी विजयी झाल्या. आपच्या उमेदवार राजश्री च्यारी यांना अवघी २२० मते मिळाली. त्यामुळे अॅड. पाटकर यांचे राजकीय भवितव्य कठीण झाले आहे. आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी थिवी विधानसभा मतदारसंघातून २०२२ मध्ये निवडणुक लढवली होती.
या मतदारसंघात शिरसई व कोलवाळ हे मतदारसंघ येतात. कोलवाळ मधून कविता कांदोळकर या अपक्ष उमेदवार ५६३५ मते घेऊन जिंकल्या. त्यांना भाजपच्या सपना मापारी यांनी ४२२४ मते घेऊन लढत दिली. येथे आरजीच्या उमेदवार प्रज्ञा सावंत यांना १९९६ मते मिळाली तर शिरसई मधून काँग्रेसचे निलेश कांबळी ४७०१ मते घेऊन जिंकले. त्यांनी भाजपचे सागर मावळणकर ४६२२ मते पराभव केला. येथेही आरजीच्य सायप्रीन परेरा यांना १८९६ मटे मिळाली. त्यामुळे मनोज परक यांच्याही राजकीय भवितव्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे.
दीपक ढवळीकर यशस्वी
मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी २०२२ मध्ये प्रियोळमधून निवडणूक लढवली होती ते येथे यापूर्वी दोन वेळा निवडून आले होते. प्रियोळमधील वेलिंग जि.पं. मतदारसंघातून मगोच्या उमेदवार आदिती गावडे या ८१७६ मते घेऊन जिंकल्या. दक्षिणेत सर्वात जास्त आघाडी घेऊन मगो उमेदवार जिंकल्या.
प्रियोळमधील दुसरा जि.पं. मतदारसंघ हा बेतकी खांडोळा येथे मगो पक्षाचेच कार्यकर्ते असलेले सुनील जन्मी भोमकर हे अपक्ष म्हणून ८०८१ मते घेऊन जिंकले. त्यानी भाजप उमेदवार श्रमेश भोसले ५९८८ मते यांचा पराभव केला. त्यामुळे आमदार गोविंद गावडे यांना धक्का बसला असून ढवळीकर यांचा प्रियोळवरील दावा मजबूत झाला आहे.