

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा मोरजी येथे असणारा बास्टीअन बीच रिव्हेरा रिसॉर्ट वादात सापडला आहे. या बीच क्लबवरील बांधकाम पाडण्याच्या प्रकरणात गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) २६ डिसेंबर रोजी अंतिम आदेश देणार आहे.
उच्च न्यायालयाने जीसीझेडएमएला गेल्या मंगळवारी २३ रोजी या संदर्भातील स्पष्ट निर्देश दिले होते. त्यामुळे या क्लबचे भवितव्य गुरुवारी ठरणार आहे. बास्टीअन बीच रिव्हेरा रिसॉट हा अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या मालकीचा आहे.
हा रिसॉर्ट चालवणाऱ्या कॅरिक बैंड रिअल्टी एलएलपी यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार अर्जावर विद्यमान जीसीझेडएमए समितीचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
सध्याच्या जीसीझेडएमएचा समितीचा कार्यकाळ २६ डिसेंबर २०२५ रोजी संपत असून, केंद्र सरकारकडून नवीन समिती नियुक्त होण्यास विलंब होऊ शकतो, ही बाब न्यायालयाने लक्षात घेतली. त्यामुळे हायकोर्टान जीसीझेडएमएला २४ डिसेंबर रोजी तातडीची सुनावणी घेण्याचे आणि २६ डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जीसीझेडएमएने त्यावर सुनावणी घेऊन त्यावरील निर्णय उद्या २६ डिसेंबरला ठेवला आहे.
जर निर्णय देणे शक्य नसल्यास अंतरिम आदेश देण्याच्या मागणीचा विचार करण्यास उच्च न्यायालयाने जीसीझेडएमएला मुभा दिली आहे. दरम्यान, हडफडे दुर्घटनेनंतर सरकारने राज्यातील किनारपट्टी भागातील बार व रेस्टॉरंटस् तसेच नाईट क्लबच्या परवान्यांच्या तपासणीस सुरुवात केली आहे.
अनेकांकडे काही परवाने नसल्याने काही नाईट क्लब व रेस्टॉरंटस् सील करण्यात आले त्यामध्ये कर्लीसचाही समावेश आहे. ऐन डिसेंबर महिन्यात ही कारवाई होत असल्याने अनेकांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. पाच वर्षांच्या कालावधीत, प्राधिकरणाकडे ५५५ तक्रारी प्राप्त झाल्या.
यापैकी २५५ तक्रारी सर्वाधिक बार्देश तालुक्यातून होत्या. त्यापैकी केवळ २४ टक्के प्रकरणांमध्येच आस्थापने पाडण्याची कारवाई झाली. राज्यातील ५५५ पैकी केवळ १३८ प्रकरणांमध्येच बांधकाम पाडण्यात आली. परंतु त्यापैकी काही मोडतोड केवळ अंशतःच करण्यात आली होती.