

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील महिला आर्थिक, डिजिटल क्षेत्रात आघाडीवर असून राज्यातील २४ टक्के महिला इंटरनेट वापरतात, अशी माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएच-एस)- ६ नुसार, गोव्यातील ज्या महिलांकडे मालमत्ता आहे, इंटरनेटची सुविधा आहे आणि त्या आपली कमाई कशी खर्च करायची हे ठरवतात, अशा महिलांची टक्केवारी वाढली आहे.
सर्वेक्षणात अनेक सकारात्मक निर्देशक देखील दिसून आलेत. २२.५ टक्के विवाहित महिलांनी सांगितले की, त्या घरातील निर्णय प्रक्रियेत भाग घेतात. स्वतः बँक किंवा बचत खाते चालवणाऱ्या महिलांचे प्रमाण मागील सर्वेक्षणातील ८८.३ टक्के वरून ९१.१ टक्के पर्यंत वाढले आहे. मात्र, पती-पत्नीमधील हिंसाचाराच्या घटनांतही वाढ होत असल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आले आहे.
एनएफएचएस-६ ने उघड केले की, गोव्यातील ९४ टक्के महिला इंटरनेट वापरत आहेत, तर २१ टक्के पुरुषांनी इंटरनेट वापरले होते, असे या आकडेवारीतून समोर आले आहे. मागील सर्वेक्षणात ७३.७ टक्के महिला आणि ६९.७ टक्के पुरुषांनी इंटरनेट वापरल्याचे स्पष्ट झाले होते. आता ही टक्केवारी वाढली आहे. वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे घर किंवा जमीन असलेल्या महिलांचे प्रमाण एनएफएच-एस-६ मध्ये २१.४ टक्केपर्यंत वाढले, जे मागील सर्वेक्षणात १६ टक्के होते.
सध्या १५ ते ४९ वयोगटांतील विवाहित महिलांपैकी २३.४ टक्के महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली होती, तर त्याच वयोगटांतील विवाहित पुरुषांपैकी फक्त ०.१ टक्के पुरुषांनी नसबंदी केली होती. राज्यातील ९१.१ टक्के लोकांचे बँक/बचत खाते आहे. मागील सर्वेक्षणात ही संख्या ८८.३ टक्के होती. पती/पत्नीक-डून होणाऱ्या हिंसेचे प्रमाण राज्यात ११.३ टक्के आहे.
मागील वेळी ही संख्या ८.३ टक्के इतकी होती. सर्वेक्षणात असेही आढळून आले की ३९ टक्के महिला आधुनिक कुटुंब नियोजन पद्धती वापरत आहेत. तर ३३.८ टक्के महिला पारंपरिक पद्धतींवर अवलंबून आहेत. आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे १८ ते ४९ वयोगटातील ११.३ टक्के विवाहित महिलांनी आयुष्यात कधीतरी पती/पत्नीकडून होणाऱ्या हिंसाचाराचा अनुभव घेतल्याचे सांगितले. जे मागील सर्वेक्षणातील ८.३ टक्के होते. यापैकी २ टक्के महिलांनी त्यांना गर्भधारणेदरम्यान हिंसाचाराचा अनुभव आला, असे सांगितले.
२० टक्केपेक्षा जास्त महिलांनी पहिल्या तिमाहीत प्रसूतिपूर्व तपासणी करून घेतली. नवजात अर्भकांना धनुर्वातापासून संरक्षण देऊन जन्म दिला आणि डॉक्टर, नर्स यांच्याकडून प्रसूतीपश्चात काळजी घेतली. सर्वेक्षणात असेही आढळून आले की गोव्यातील ९९.०६ टक्के जन्म प्राथमिक आरोग्य केंद्रे व इस्पितळात होतात.
दहापैकी नऊ महिलांकडे मोबाईल
सर्वेक्षण केलेल्या १० पैकी ९ महिलांनी सांगितले की त्यांच्याकडे मोबाईल फोन आहे आणि त्या तो वापरतात, तर १५-२४ वयोगटांतील ९७.५ टक्के महिलांनी मासिक पाळी दरम्यान स्वच्छ पद्धती वापरत असल्याचे सांगितले.