Goa Pink Force : 'पिंक फोर्स' महिलांच्या सुरक्षिततेसाठी वेगवान, विश्वासार्ह आणि संवेदनशील पोलिस बळ

साडेचार वर्षांत १८,९४७ हून अधिक आपत्कालीन कॉल्सना प्रतिसाद
Goa Pink Force
Goa Pink Force
Published on
Updated on

काव्या कोळस्कर

पणजी : गोवा हे देशातील सर्वात महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटक गोव्यात दाखल होतात. यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्याही मोठी असते. अशा परिस्थितीत महिलांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि संकटाच्या क्षणी त्वरित मदत उपलब्ध करून देणे, ही काळाची गरज होती. याच पार्श्वभूमीवर १७ डिसेंबर २०२१ रोजी गोवा सरकारने ' पिंक फोर्स'ची स्थापना केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सुरू झालेल्या या विशेष पोलिस पथकाचा मुख्य उद्देश महिलांमध्ये आणि मुलांमध्ये सुरक्षा व विश्वासाची भावना निर्माण करणे हा आहे. महिलांविरुद्ध होणारे गुन्हे रोखणे, संकटात सापडलेल्या महिलांना तातडीने मदत करणे आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, ही पिंक फोर्सची प्रमुख जबाबदारी आहे.

विशेष म्हणजे, गोव्यातील ' पिंक फोर्स ' ही इतर राज्यांतील अशाच उपक्रमांपेक्षा वेगळी ठरते. अनेक राज्यांमध्ये अशा पथकांचे लक्ष मुख्यतः स्थानिक महिला आणि सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षेवर असते; मात्र गोव्यातील ' पिंक फोर्स' स्थानिक महिलांसोबतच देश-विदेशातून येणाऱ्या महिला पर्यटकांच्या सुरक्षेलाही तितकेच महत्त्व देते. किनारपट्टी, समुद्रकिनारे, बाजारपेठा, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा आणि पर्यटनस्थळे येथे या पथकाची नियमित गस्त असते.

१७ डिसेंबर २०२१ पासून ३१ मार्च २०२६ पर्यंत ‘पिंक फोर्स’ने एकूण १८,९४७ आपत्कालीन कॉल्सना प्रतिसाद दिला आहे. महिलांवरील अत्याचार, छेडछाड, कौटुंबिक वाद यांसोबतच अपघात, भांडणे, वैद्यकीय मदत आणि बालसुरक्षेशी संबंधित घटनांमध्येही हे पथक प्रथम प्रतिसाद देत आहे. या पथकातील महिला पोलिसांना केवळ कायदा-सुव्यवस्थेचे प्रशिक्षणच नव्हे, तर समुपदेशन, स्वसंरक्षण, प्रथमोपचार, संवादकौशल्य, सार्वजनिक संवाद, दिव्यांगांच्या हक्कांविषयी जागरूकता आणि नवीन कायद्यांचे प्रशिक्षणही दिले जाते. त्यामुळे केवळ गुन्हे नोंदवणे नव्हे, तर संवेदनशीलतेने प्रश्न सोडवण्याची क्षमता या पथकात विकसित झाली आहे.

प्रभावशाली क्विक रिस्पॉन्स सिस्टम

महिलांना मदतीसाठी ERSS-११२, महिला हेल्पलाईन १०९१ आणि महिला व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन ७८७५७५६१७७ हे क्रमांक उपलब्ध आहेत. कंट्रोल रूममध्ये कॉल आल्यानंतर जवळील ' पिंक फोर्स' वाहनाला त्वरित माहिती पाठवली जाते. हे पथक घटनास्थळी सर्वप्रथम पोहोचते आणि आवश्यक ती मदत करते. गरज भासल्यास संबंधित महिलेला जवळच्या पोलिस ठाण्यात सुरक्षितपणे पोहोचवले जाते. या ' क्विक रिस्पॉन्स सिस्टम 'ची कार्यक्षमता उल्लेखनीय ठरली आहे. २०२५ मध्ये सरासरी प्रतिसाद वेळ ७ मिनिटे ६ सेकंद इतका होता, तर १ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत तो आणखी सुधारून ६ मिनिटे ५७ सेकंदांवर आला. या आकडेवारीवरुनच या यंत्रणेची तत्परता सिद्ध होते.

अधिक मनुष्यबळ : वाहनांची वाढती गरज

गोव्यात सध्या १० ' पिंक फोर्स ' वाहने कार्यरत असून, ही संख्या वाढवण्याची गरज पोलिस विभागाने व्यक्त केली आहे. वाढते पर्यटन, दुर्गम भागांमध्ये वाढती वर्दळ आणि त्वरित प्रतिसादाची आवश्यकता लक्षात घेता आणखी १४ नवीन वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रक्रियेत आहे. तसेच मनुष्यबळाच्या कमतरतेवरही उपाययोजना सुरू आहेत.

एकट्या महिला प्रवाशांचा आधार !

विशेषतः एकट्या महिला प्रवाशांसाठी ' पिंक फोर्स' हा मोठा आधार ठरत आहे. सार्वजनिक ठिकाणी महिला पोलिसांची उपस्थिती महिलांच्या मनात विश्वास निर्माण करते. ' गोवा सुरक्षित आहे ' हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्याचे काम हे पथक करत आहे. त्यामुळे पर्यटनप्रधान गोव्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने ही यंत्रणा अधिक बळकट करण्याची मागणी केवळ नागरिकच नव्हे तर पर्यटकांमधूनही मोठ्या प्रमाणात होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news