

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यभरात साधारण महिनाभरापासूनच उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सर्वत्र उष्णतेची तीव्रता वाढू लागली असून, भारतीय हवामान विभागाने महिनाअखेरीपर्यंत उष्ण वातावरण कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
मार्च महिन्याच्या सरासरी ३२.६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान सतत नोंदवले जात असल्याने यंदाचा उन्हाळा लवकरच अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. २१ मार्च रोजी ३४.४ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदवण्यात आले, जे २०२० मधील त्याच दिवसाच्या ३४.६ अंश तापमानाच्या जवळपास आहे.
यावरून गोव्यात यंदाचा उन्हाळा कडक होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. २० मार्चपासून तापमानात हळूहळू पण सातत्याने वाढ होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. त्या दिवशी तापमान सुमारे ३३ अंशांवर होते, जे आधीच सरासरीपेक्षा जास्त होते. २१ मार्च रोजी तापमान ३४ अंशांपलीकडे गेल्याने हंगामातील आतापर्यंतची सर्वोच्च नोंद झाली.
हवामानात तफावत
२२ ते २४ मार्चदरम्यान तापमान ३३ ते ३४ अंशांच्या दरम्यान स्थिर राहिले. २५ मार्च रोजी पणजी येथे कमाल तापमान ३३.६ अंश, तर किमान तापमान २४.५ अंश नोंदवले गेले. ही दोन्ही तापमान सरासरीपेक्षा किंचित जास्त असून, दिवसा उष्ण आणि रात्री दमट हवामानाचा अनुभव कायम असल्याचे दिसून येत आहे.
३१ मार्चपर्यंत हवामान कोरडे
आयएमडीच्या अंदाजानुसार, २५ ते ३१ मार्चदरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीला आकाश अंशतः ढगाळ राहील, तर आठवड्याच्या शेवटी प्रामुख्याने स्वच्छ व उन्हाळी वातावरण राहणार आहे. या कालावधीत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता असून, किमान तापमान २३ ते २५ अंशांदरम्यान राहील. त्यामुळे उष्णतेत लक्षणीय बदल अपेक्षित नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.