

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील ११२ जलस्रोतांपैकी ५९ टक्के प्रदूषित झाली असून ३९ तलावांना पाण्याच्या कमी गुणवत्तेच्या श्रेणीत टाकण्यात आले आहे. पर्यावरण अहवाल २०२५ नुकताच प्रकाशित करण्यात आला. यात राज्यातील तलावांच्या बिघडत्या स्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. ज्यात ३९ तलावांना वर्ग ई म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.
जे सर्वात कमी पाण्याच्या गुणवत्तेचे वर्ग आहे. राज्यातील तलावांची सध्याची स्थिती वाढती पर्यावरणीय चिंता दर्शवते, असे पर्यावरण खात्याने तयार केलेल्या अहवालात नमूद केले आहे. राज्यातील काही तलाव तथा जलसाठे आंघोळीसाठी देखील अयोग्य आहेत आणि ते सिंचन आणि औद्योगिक शीतकरण यासारख्या मर्यादित वापरांपुरते मर्यादित केले पाहिजेत.
सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, गोव्यातील ११२ चाचणी केलेल्या जलसाठ्यांपैकी ५९ टक्के जलसाठे, ज्यात शेतातील तलाव, मंदिराचे तलाव यांचा समावेश आहेत, ते प्रदूषित आहेत. चिंबल येथील तोयार तलावावर सर्वेक्षण सुरू आहे. हे तळे जैवविविधता, भूजल पुनर्भरण आणि हंगामी पूर नियमनास समर्थन देणारा गोड्या पाण्याचा स्रोत आहे.
अभ्यासात गोव्यातील तलावांमध्ये शेवाळ फुलणे आणि जलीय जैवविविधतेचे विघटन वाढत असल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे मत्स्यव्यवसाय, शेती आणि उपजीविका धोक्यात आली आहे. अंजुना आणि नार्वे सारख्या सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्रांजवळील तलावांना देखील असुरक्षित मानले गेले आहे.
पाणथळ जागा काटेकोरपणे नियंत्रित केल्या गेल्या नाहीत आणि सांडपाणी आणि वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन केले गेले नाही, तर गोव्याला त्याचे तलाव गमावण्याचा धोका आहे, असे अहवालात नमूत करण्यात आले आहे.
अहवालानुसार, २०१८-१९ आणि २०२४-२५ दरम्यान गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाण्याच्या गुणवत्तेच्या निरीक्षणातून असे दिसून आले आहे की तोयार तलावातील प्रमुख भौतिक-रासायनिक पॅरामीटर्स मोठ्या प्रमाणात स्वीकार्य मयदित राहिले.
अहवालात इशारा देण्यात आला आहे की, स्थिरतेमुळे प्रदूषकांचे संचय होते, ज्यामुळे तलावाच्या पाण्याची गुणवत्ता बिघडते. तोयार आणि करमळी तळ्यांसह काही तलाव, वेटलँड्स (संवर्धन आणि व्यवस्थापन) नियम, २०१७अंतर्गत संरक्षित आहेत. परंतु अहवालात कमकुवत अंमलबजावणीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.