

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
वागातोर समुद्रकिनाऱ्यावर २०२५ -२०२६ या हंगामात ऑलिव्ह रीडले जातीच्या समुद्री कासवांनी १० वेळा येऊन सुमारे ११६० अंडी घातली असल्याची माहिती वनखात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, यंदा समुद्री कासवांनी घातलेल्या ११६० अंड्यातून फक्त ३३८ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली, याचाच अर्थ ८२२ अंडी खराब झाली असावीत, अशीही दाट शक्यता पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत आहे. ही कासवे ऑक्टोबर ते एप्रिल यादरम्यान समुद्रकिनाऱ्यावर प्रजननासाठी येत असतात.
यंदाच्या हंगामात सुमारे १० समुद्री कासवांनी किनाऱ्यावर येऊन सुमारे ११६० अंडी घातली, तर १० ते १२ वेळा समुद्रकिनाऱ्यावर आलेली कासवे माघारी फिरून गेल्याचे आढळून आले. वागातोर किनाऱ्यावर कासव संवर्धन केंद्र अर्थात हॅचरी नसल्यामुळे वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी ही अंडी मोरजी, पेडणे येथील कासव संवर्धन केंद्रात नेली होती. या अंड्यांमधून सुमारे ३३८ कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
या समुद्रकिनाऱ्यावर समुद्री कासवे मोठ्या प्रमाणात अंडी घालण्यासाठी येतात. घालण्यात आलेली अंडी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवर्धनासाठी मोरजी येथील संवर्धन केंद्रात नेली जातात याकरिता वागातोर समुद्रकिनाराच कासव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करावे तसेच या ठिकाणी संवर्धन केंद्र सुरू करावे अशी मागणी आम्ही गेल्या चार वर्षांपासून करीत आहोत.
सर्व संबंधित खात्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे; परंतु अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही, अशी खंत हणजूण कायसुव जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी व्यक्त केली आहे. यंदा समुद्री कासवांनी घातलेल्या ११६० अंड्यातून फक्त ३३८ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली, याचाच अर्थ ८२२ अंडी खराब झाली असावीत.
जर वन खात्याने वागातोर समुद्रकिनाऱ्यावर कासव संवर्धन केंद्र अर्थात हॅचरी सुरू केली असती तर ही अंडी मोरजी येथील हॅचरीमध्ये नेण्याची वेळ आली नसती आणि मोठ्या प्रमाणात अंडी खराबही झाली नसती याचसाठी आम्ही या समुद्रकिनाऱ्यावर कासव संवर्धन केंद्र अर्थात हॅचरी सुरू करावी अशी मागणी करीत आहोत, असे नाईक यांनी सांगितले. या समुद्रकिनाऱ्यावर गेल्या अनेक वर्षांपासून ऑलिव्ह रीडले जातीची समुद्रि कासवे अंडी घालण्यासाठी येत असतात; परंतु त्याची दखल घेतली जात नव्हती.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हणजूण कायसुव जैवविविधता समितीच्या निदर्शनास सदर बाब आल्यानंतर त्यांनी वनखात्याला याची दखल घेण्यास भाग पाडले. त्यानंतर वन खात्याकडून या समुद्रकिनाऱ्यावर कर्मचाऱ्यांना पाठवणे सुरू झाले. रात्रीच्या वेळी या वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना या समुद्रकिनाऱ्यावर निवाऱ्याची सोय नसल्याने गेल्या दहा दिवसापूर्वी वन खात्याने या समुद्रकिनाऱ्यावर एक बूथ उभा केला आहे. या बूथला अध्याप वीज जोडणी मिळाली नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
'या' कारणांमुळे कासवांनी फिरविली पाठ
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी प्रमाणात समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी आल्याचे निदर्शनास आले. असाच प्रकार इतरही ठिकाणी झाल्याचे समजते. समुद्रकिनाऱ्यावर रात्रीच्या वेळी होणारा पर्यटकांचा वावर, समुद्रकिनाऱ्यावर लावण्यात आलेले प्रखर प्रकाश दिवे तसेच वाहनांच्या हेडलाईटचा पडणारा प्रकाश, वाजणारे कर्णकर्कश संगीत, या व अशा प्रकारच्या काही कारणांमुळे ऑलिव्ह रीडले जातीची समुद्री कासवे येथील किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आली नसावीत.